महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागावी अन् भाजप शिवसेनेचं सरकार पुन्हा यावं..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते अस विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी चंद्रकांतदादांच्या सुरात सूर मिसळत त्यांच्या विधानाला पाठिंबा दिला आहे. तसेच यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपच्या युतीबाबत आशा व्यक्त केली आहे.

रामदास आठवले म्हणाले, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्याशी मी सहमत आहे. महाविकास आघाडीचे सरकार गेलेच पाहिजे आणि त्यासाठी भाजप आणि शिवसेनेची युती हवी. या दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र यावे असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुणे येथे म्हटले आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या राष्ट्रपती राजवटीच्या विधानाची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र खिल्ली उडवली होती. चंद्रकांत पाटील यांना महाराष्ट्र गांभीर्याने घेत नाही, तरी त्यांना वाटत असेल की राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत अशा शब्दांत पवारांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला होता.