कराडला महिला कुस्तीत अमृता चाैगुलेने मैदान मारले : पुरूष गटात अक्षय मोहिते, दिग्विजय जाधव विजयी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कराड शहरातील बैलबाजार येथे आयोजित कुस्ती स्पर्धेला कुस्ती प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कुस्ती मैदनात पहिल्या क्रमाकांच्या दोन कुस्त्या लावण्यात आल्या होत्या. त्यामध्ये अक्षय मोहिते (बेलवडे बुद्रुक) व दिग्विजय जाधव (सुपने) यांनी नंबर एकच्या कुस्तीमध्ये विजयी मिळवला. तर महिला कुस्तीत शिवछत्रपती कुस्ती केंद्र सुपने येथील अमृता चौगुले हिने कुस्तीचे मैदान मारले.

या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र उर्फ आप्पा माने, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, अधिकराव चव्हाण (पप्पू शेठ), राहुल चव्हाण, भास्कर देवकर, धनाजी काटकर, इंद्रजीत गुजर, नानासाहेब पाटील, नितीन थोरात, शिवाजी मोहिते आदींसह सर्व कुस्तीप्रेमी यावेळी उपस्थित होते. या कुस्ती पाहण्यासाठी कराड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कुस्तीप्रेमी बैलबाजार मैदानावर उपस्थित होते.

या स्पर्धेनिमित्त अधिकराव चव्हाण म्हणाले की, आपल्या भागात कुस्ती बद्दल आस्था निर्माण व्हावी यासाठी अशा कुस्त्यांच्या स्पर्धांचे आयोजन केले गेले पाहिजे. आज इथे नंबर एकच्या कुस्तीसाठी दोन कुस्त्या लावल्या गेल्या होत्या. तसेच महिलांच्या कुस्तीला सुद्धा कुस्तीप्रेमींनी दाद दिली. लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत तसेच महिलांमध्ये सुद्धा कुस्ती बद्दल आस्था निर्माण व्हावी यासाठी कुस्ती स्पर्धेचे आयोजन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेला कराड तालुक्यातून असंख्य कुस्तीप्रेमींनी हजेरी लावून चांगली दाद दिली.