हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना (Vocational Courses) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET कक्ष) एमबीए/एमएमएस, एमसीए, बी-एचएमसीटी / एम-एचएमसीटी इंट्रीग्रेटेड, बी-डिझाईन आणि एम-एचएमसीटी या पाच अभ्यासक्रमांसाठी अर्ज नोंदणी प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. आता विद्यार्थ्यांना १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहे.
यंदा डिसेंबरच्या अखेरीस CET कक्षाने या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली होती. एमबीए/एमएमएस आणि एमसीएच्या नोंदणीला २५ डिसेंबरपासून, बी-एचएमसीटी / एम-एचएमसीटी इंट्रीग्रेटेडसाठी ३१ डिसेंबरपासून, तर बी-डिझाईन आणि एम-एचएमसीटीसाठी ४ जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना सुरुवातीला एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. मात्र अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद न मिळाल्याने नोंदणीची अंतिम तारीख ३१ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली होती.
दरम्यान, मुदतवाढीनंतरही विद्यार्थ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आतापर्यंत एमबीए/एमएमएससाठी ४४,६३०, बी-एचएमसीटी / एम-एचएमसीटी इंट्रीग्रेटेडसाठी ६९०, बी-डिझाईनसाठी ३२३, आणि एम-एचएमसीटीसाठी केवळ ३६ विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केला आहे. विद्यार्थ्यांकडून होत असलेल्या कमी सहभागामुळे अनेकांना प्रवेशाच्या संधी गमवाव्या लागू शकतात, अशी भीती CET कक्षाने व्यक्त केली आहे.
विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी
विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी अधिक संधी मिळावी आणि ऐनवेळी होणाऱ्या धावपळीला टाळता यावे, यासाठी CET कक्षाने दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता १० फेब्रुवारीपर्यंत इच्छुक विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि शक्य तितक्या लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन CET कक्षाकडून करण्यात आले आहे.
अर्ज कसा करावा?
विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर (cetcell.mahacet.org) जाऊन अर्ज भरावा लागेल. अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क आणि अर्ज प्रक्रियेसंबंधी सर्व तपशील वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
विद्यार्थ्यांसाठी ही अंतिम संधी असू शकते, त्यामुळे इच्छुकांनी विलंब न करता अर्ज भरावा, असे CET कक्षाने स्पष्ट केले आहे.