सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
महापालिकेत १२ व २४ वर्षे सेवा बजाविलेल्या वर्ग तीन व चारच्या २४५ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. महापालिकेच्या इतिहासात कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठा हा निर्णय असल्याची माहिती महापौर संगीता खोत यांनी दिली. या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम शुक्रवारी दुपारी चार वाजता होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर कर्मचारी भरतीसाठी आकृतीबंध लवकरच तयार केला जाईल व कर्मचारी भरतीची प्रक्रिया सुरू होईल, अशी ग्वाही महापौरांनी दिली.
महापालिकेच्या वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याची मागणी सतत होत होती. सन २००२ मध्ये दोन लिपिकांना २००८ काही मोजक्या कर्मचाऱ्यांना तर २०१५ साली वीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली होती. अनेक कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या रखडल्या होत्या. त्यामुळे महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पदोन्नतीचा विषय मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार वर्ग तीनमधून एक लेखापाल, दोन हेड नर्स, एक उद्यान पर्यवेक्षक, एक वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक, एक सबफायर ऑफिसर, एक सिनियर कंपौंडर कम क्लार्क, पाच अधीक्षक, एक स्टेनो टायपिस्ट, एक सिनिअर मिस्त्री, एक सहाय्यक ग्रंथपाल, ४२ वरिष्ठ लिपीक, तीन शाखा अभियंता, एक ड्राफ्रटसमन, एक पाईप इन्सपेक्टर अशा 62 पदावर पदोन्नती देण्यात आली. तर वर्ग चाररमधील एक मेकॅनिक कम गॅरेज इनचार्ज, दोन टेलिफोन ऑपरेटर, ८८ कनिष्ठ लिपीक, दोन सॅनिटरी इन्सपेक्टर, पाच मिस्त्री, तीन फिल्टर ऑपरेटर, तीस पंप ऑपरेटर, एक मिटर रिपेअर, एक फीटर, तीन वारमॅन, लाईट इन्सपेक्टर, नऊ वाहन चालक असे १४५ पदावर पदोन्नती देण्यात आली.