Sunday, June 4, 2023

पंजाब विधानसभा निवडणूका पुढे ढकलल्या; आता ‘या’ दिवशी होणार मतदान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी उत्तरप्रदेश, मणिपूर, गोवा, पंजाब आणि उत्तराखंड राज्याच्या निवडणूका निवडणुक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यातील पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री चन्नी यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते, त्यांनतर निवडणूक आयोगाने निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला

निवडणूक आयोगाने यापूर्वी पंजाबमध्ये मतदानाची तारीख १४ फेब्रुवारीला घोषित केली होती. पण १६ फेब्रुवारीला संत रविदास जयंती असल्याने राजकीय पक्षांनी निवडणुका काही दिवस पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता १४ फ्रेब्रुवारी ऐवजी २० फेब्रुवारी ला मतदान होईल असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं

पंजाबमधून १६ फेब्रुवारी या दिवशी मोठ्या संख्येने लोक उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील गुरूच्या जन्मस्थानाला भेट देतात. त्यामुळे १४ फेब्रुवारीला मतदान आणि यूपीतील निवडणुकांमुळे भाविकांना तिथे पोहोचणे कठीण होणार आहे. त्यामुळे मतदानाची तारीख ६ दिवस पुढे ढकलावी, अशी मागणी पंजाबमधील सर्वपक्षांनी केली होती.