व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

आर. के. लक्ष्मण स्मृतिसंग्रहालयात जागतिक संग्रहालय दिन उत्साहात साजरा

पुणे | आर. के. लक्ष्मण स्मृतिसंग्रहालय, बालेवाडी, पुणे इथे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विख्यात भौतिक शास्त्रज्ञ आणि नॅनो टेक्नॉलॉजिस्ट डॉ. सुलभा कुलकर्णी, उद्योजक आणि हौशी मूर्तिकार, चित्रकार काशीनाथ कुलकर्णी, एस. बी. आय फाउंडेशनचे रितेश सेन, सेवा सहयोग फाउंडेशनचे डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स शैलेश घाटपांडे, रेडियो सिटीच्या आर. जे. तेजू , आर. के. लक्ष्मण फाउंडेशनच्या चेअरमन उषा लक्ष्मण, मेकशिफ्टच्या फाउंडर्स रुचिरा सावंत आणि शर्वरी कुलकर्णी आणि स्नेहवन संस्थेचे विद्यार्थी, आर के लक्ष्मण म्युझियम आणि मेकशिफ्टची टीम उपस्थित होते.

याप्रसंगी एसबीआय फाउंडेशन, सेवा सहयोग फाउंडेशन, आर. के. लक्ष्मण फाउंडेशन आणि मेकशिफ्ट यांच्या सहयोगातून पुण्यातील शाळांमध्ये राबवण्यात येणाऱ्या ‘व्हिजनथ्रेड’ या शैक्षणिक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आणि त्यासंबंधीत मीडिया पोस्टचे अनावरण करण्यात आले.

संग्रहालयात असलेला लक्ष्मण यांच्या चित्रांचा, कारकिर्दीचा वारसा फक्त ठराविक लोकांपुरता मर्यादित न राहता, त्या चित्रांचा विद्यार्थ्यांना शिक्षणात उपयोग व्हावा आणि आर. के. लक्ष्मण संग्रहालय हे एक शिक्षण आणि संशोधन केंद्र म्हणून आकारास यावे, हा विचार संस्थेच्या चेअरमन उषा लक्ष्मण यांनी मांडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रुचिरा सावंत यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना त्यांनी आर. के. लक्ष्मण यांच्याबद्दल आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवसाबद्दल थोडक्यात माहिती दिली.

स्नेहवन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी हा संग्रहालय दिन आगळ्या पद्धतीने साजरा केला. रोहन कुलकर्णी यांनी संग्रहालयाच्या निर्मितीची गोष्ट सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांनी संग्रहालय पूर्ण फिरून लक्ष्मण यांच्या जीवनातील विविध प्रसंग समजून घेतले. विद्यार्थ्यांनी चित्रे पाहून त्यावर आपले विचार व्यक्त केले. तसेच संग्रहालयातील कलाकृतींच्या निर्मिती प्रक्रियेवर प्रश्न विचारले. संग्रहालयातील भेटीमुळे प्रेरित झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी चित्र काढण्याचा निर्धार केला आणि पुन्हा गेल्यानंतर काय चित्र काढणार हेही सांगितले. यानंतर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

“आर. के. लक्ष्मण यांच्या कलाकृति पाहून मी मोठा झालो. एस. बी. आय. फाऊंडेशनच्या सहकार्याने आपण वंचित विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत, याचा आनंद होत आहे” असे एसबीआय फाउंडेशनच्या रितेश सेन यांनी मांडले.रेडिओ जॉकी तेजू यांनी आपल्या रेडिओ क्षेत्रातील प्रवासाबद्दल सांगितले. गोष्ट सांगायला आवडते म्हणून त्यातील संधी शोधायचा प्रयत्न करत छोट्याशा गावातून आज इथपर्यंत पोहोचले असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात त्यांची आवड शोधण्याचा आणि त्यामध्ये उत्तम ते साध्य करण्यासाठी झटण्याचा संदेश दिला.

उद्योजक काशीनाथ कुलकर्णी यांनी टाइम्स ऑफ इंडियाच्या ऑफिसमध्ये गेले असताना आर. के. लक्ष्मण यांची भेट झाली असल्याचा किस्सा सांगितला. लक्ष्मण चित्र काढत असतानाचा एक फोटो संग्रहालयात लावला आहे, त्या दृश्याचा साक्षीदार असल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. संग्रहालय ही संस्कृती, कला यांचा वारसा जपून ठेवणारी महत्वाची संस्था आहे. वेगवेगळ्या काळात रेखाटलेली चित्रे आणि त्या काळातील संदर्भ इथे मांडलेले असल्याने या वस्तूला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. असे डॉ सुलभा कुलकर्णी यांनी सांगितले.

“लक्ष्मण यांचे हे स्मारक आमच्यासाठी एक भावना आहे, ही भावना सर्वांपर्यंत पोहचावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.”, असे उषा लक्ष्मण यांनी आपल्या भाषणात मांडले. उषा लक्ष्मण यांनी आर. के. लक्ष्मण यांच्या चित्राची एकेक प्रत उपस्थित विद्यार्थ्यांना भेट म्हणून दिली व रुचिरा सावंत यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

संग्रहालयाविषयी:

पुण्यात बालेवाडी येथे पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने आर. के. लक्ष्मण यांचे स्मृतीसंग्रहालय सुरू करण्यात आले असून १४ नोव्हेबर २०२२ रोजी बालदिनाच्या निमित्ताने त्याचे लोकार्पण करण्यात आले. येथे लक्ष्मण यांच्या जीवनाचे विविध पैलू व्यंगचित्रे, दृकश्राव्य कार्यक्रम यांच्या माध्यमातून सर्वांना पाहता येतील. या संग्रहालयात आर. के. लक्ष्मण यांची ३५००० + व्यंगचित्रे डिजिटाइज स्वरूपात जतन केलेली आहेत. त्यांची निर्मिती असलेला कॉमन मॅन इथे संग्रहालयाची सफर घडवून आणतो. एखाद्या चरित्रपटाप्रमाणे आर. के. लक्ष्मण यांच्या आयुष्याचा आरंभ, उमेदीचा काळ आणि शेवट असा हा प्रवास असून त्यात आजच्याही अनेक विषयांची झलक अनुभवायला मिळेल.

संग्रहालय:
वार व वेळ : मंगळवार ते रविवार, सकाळी १० ते ५
संग्रहालयाला तिकीट शुल्क आहे.