कौतुकास्पद..! प्रभासच्या ‘राधे श्याम’ या आगामी चित्रपटाचा संपूर्ण सेट कोरोना रुग्णांसाठी दिला दान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण देशात कोरोना महामारीमुळे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. याचा परिणाम थेट आरोग्य यंत्रणेवर झाला असून व्यवस्थांची कमतरता जाणवू लागली आहे. यामुळे अनेक रुग्णांना आपला प्राण गमवावा लागत आहे. अशास्थितीत फिल्म इंडस्ट्रीचे अनेक लोक मदतीसाठी पुढे आले आहेत. सुपरस्टार प्रभासच्या ‘राधे श्याम’ या आगामी चित्रपटाच्या मेकर्सनी असाच मदतीचा हात दिला आहे. यांनी मदत म्हणून, कोट्यवधी रूपये खर्चून उभा केलेला राधेश्याम चित्रपटाचा संपूर्ण सेट एका प्रायव्हेट हॉस्पिटलला कोरोना रुग्णांसाठी दान केला आहे.

या चित्रपटासाठी हॉस्पिटलचा एक शानदार सेट उभारण्यात आला होता. इटलीतील ७० च्या दशकातील हॉस्पिटल या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. त्यासाठी हा सेट तयार केला होता़. ५० बेड, स्ट्रेचर्स, पीपीई किट्स, मेडिकल इक्यूपमेंट्सपासून ते ऑक्सिजन सिलिंडरपर्यंत सर्व काही सेटवर उपलब्ध होते. आता या सेटवर असणारी ही सर्व प्रॉपर्टी कोव्हिड रूग्णांवरील उपचारासाठी हैदराबादेतील एका खासगी रूग्णालयाला दान देण्यात आली आहे.

चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाल्यानंतर हॉस्पिटलच्या सेटवरचे सामान हटवण्यात आले होते. हे सर्व सामान थेट एका गोदामात भरून ठेवले होते. मात्र कोरोना महामारीच्या या काळात बेड्स आणि अन्य सुविधांची कमतरता भासली असता, हे सर्व साहित्य दान करण्याचा निर्णय मेकर्सने घेतला. तब्बल ९ मोठ्या ट्रकमधून हे वैद्यकीय साहित्य एका खासगी रूग्णालयात पोहोचवण्यात आले. या निर्णयात अभिनेता प्रभास देखील सामील होता. सध्या प्रभास आणि ‘राधे श्याम’च्या मेकर्सने घेतलेल्या या निर्णयाचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे.

https://www.instagram.com/tv/CGrQI_NJ-lu/?utm_source=ig_web_copy_link

‘राधे श्याम’ हा चित्रपट एक रोमॅन्टिक पीरियड ड्रामा आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार बाहुबली फेम प्रभास व बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. राधाकृष्ण कुमार यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत हा सिनेमा रिलीज होणार असल्याची माहिती आहे. मैंने प्यार किया फेम अभिनेत्री भाग्यश्री या चित्रपटातील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

Leave a Comment