राहुल कुल रासप कडूनच विधानसभा निवडणूक लढणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीत दौंड मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला उधाण आले हॊते. सोबतच भाजपचे स्थानिक कार्यकर्ते कुल हे भाजपच्याच तिकिटावर लढणार असल्याचा डंका वाजवत होते. अखेर या चर्चेला आता स्वतः राहुल कुल यांनीच पूर्णविराम दिला. ‘मी रासप कडूनच निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे भाजपमधील काही कार्यकर्त्यांनी माझ्या उमेदवारीची काळजी करू नये,’ असा सल्ला दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिला.

यावेळी कुल म्हणाले की,’भाजपने विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे अर्ज मागविले होते. त्यांच्या मुलाखतीही घेतल्या गेल्या होत्या. मात्र, मी भाजपकडे अर्ज केला नाही आणि मुलाखतींना पण गेलेलो नाही. त्यामुळे माझ्याबद्दल कोणाला संशय असण्याचे काहीच कारण नाही असं सांगत महादेव जानकर यांनी माझी उमेदवारी जाहीर केली आहे. मी रासप मधूनच निवडणूक लढविणार असल्याचं कुल यांनी यावेळी स्पष्ट केल.

गेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल या भाजपच्या तिकिटावर निवडणुक लढल्या होत्या. त्यामुळे राहुल कुल देखील भाजपच्या चिन्हावर लढणार असल्याचे बोलले जात होते. तसेच आमदार कुल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे समजले जातात. दरम्यान, कुल यांनी महाजनादेश यात्रेचे जंगी स्वागत केल होत. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुल यांच्या कामकाजाचे कौतुकही केल होत. त्यामुळेच कुल भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणार अशी अटकळ लावली जात होती.

Leave a Comment