रेल्वेचा ‘तो’ दावा खोटा!- अनिल देशमुख

मुंबई । लॉकडाऊनमुळे शहरात स्थलांतरित मजूर, कामगारांना स्वगृही परतण्यासाठी केंद्र सरकारनं रेल्वेमार्फत विशेष श्रमिक ट्रेन सुरु केल्या. परंतु लॉकडाऊनमुळे आधीच हातच काम जाऊन आर्थिक संकटात सापडलेल्या मजुराकडून प्रवास खर्च आकारण्यावरून केंद्रावर जोरदार टीका झाली. अशात रेल्वे मंत्रालयानं स्थलांतरित कामगार व मजुरांच्या परतीच्या प्रवास खर्चावर रेल्वे खातं ८५ टक्के सूट असल्याचे स्पष्ट केलं. मजुरांना प्रवास खर्चावर रेल्वे खातं ८५ टक्के सूट असल्याचं वृत्त राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेटाळून लावलं आहे.

आजपर्यंत रेल्वे खात्यानं तसा कोणताही आदेश काढलेला नाही, असं देशमुख यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातून आपापल्या गावाकडे निघालेल्या गरीब कामगार व मजुरांना आजही तिकीट काढावं लागत आहे,’ असा दावा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. ‘सध्याच्या परिस्थितीत रेल्वे प्रशासनानं गरीब कामगारांकडून प्रवास खर्च घेऊ नये,’ अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आपापल्या गावी परतणाऱ्या स्थलांतरितांना केंद्र सरकारकडून रेल्वे तिकिटात ८५ टक्के सवलत देण्यात आल्याच्या बातम्या काल प्रसारित झाल्या होत्या. स्थलांतरितांच्या प्रवासाचा खर्च केंद्र व राज्यांमध्ये ८५:१५ या प्रमाणात विभागून घेतला जाईल, असं रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आलं होतं. अनिल देशमुख यांनी हे वृत्त खोडून काढलं आहे. ‘तिकिटातील सवलतीचे असे कोणतेही आदेश रेल्वे खात्यानं काढलेले नाहीत. आजही कामगारांना स्वत:च्या खिशातील पैसे देऊन पूर्ण तिकीट काढावं लागत आहे. लॉकडाऊनमुळं स्थलांतरित कामगारांची परिस्थिती अत्यंत वाईट आहेत. त्यांच्याकडं पैसे नाहीत. अशा परिस्थितीत रेल्वे प्रशासनानं त्यांच्याकडून प्रवास खर्च घेऊ नये, असं आवाहनही देशमुख यांनी केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

You might also like