Site icon Hello Maharashtra

भोंग्याचा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे…; राज ठाकरेंचे मनसे सैनिकांना पत्र

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हातात घेतलेल्या भोंग्याच्या विषयावरून त्यांच्यावर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी निशाणा साधला होता. यावरून राज्यातील वातावरणही काहीकाळ चांगलेच तापले. त्यानंतर आता राज ठाकरे हे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर हा विषय थांबेल असे वाटत होते. मात्र, त्यांनी आज पुन्हा आपल्या मनसे सैनिकांना पत्र लिहले आहे. तसेच “मशिदीवरील भोंग्यांचा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. आपला विचार लोकांपर्यंत पोहचायला हवा, लोकसहभागाशिवाय हे आंदोलन यशस्वी होणार नाही, माझं पत्र घराघरात पोहचवा,असे आदेश ठाकरे यांनी पत्रातून दिले आहेत.

राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत कार्यकर्त्यांना पत्र पाठवले आहे. त्यांनी पत्रात म्हंटले आहे की, माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, मशिदीवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. म्हणूनच माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा, असे पत्रातून आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत.

तसेच त्यांनी पुढे पत्रात म्हंटले आहे की, तुम्ही एकच करायचं आहे माझं पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील घराघरात स्वतः नेऊन द्यायचं आहे कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही. मला खात्री आहे; जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही, अशा आशयाचे पत्र राज तावरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना पाठवले आहे.