Wednesday, October 5, 2022

Buy now

मोदींसोबतच्या बैठकीनंतर राजेश टोपेंचे मास्क सक्तीबाबत मोठे विधान; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील काही राज्यांमध्ये कोरोना विषाणूमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आगामी काळात मास्क वापरण्याबाबत निर्णय घेऊन निर्बंधही लावावे लागणार आहेत. याबाबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाला रोखायचे असेल तर लसीकरणावर भर देणे आवश्यक असल्याचे सांगितले. पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज्यातील मास्क सक्तीबाबत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी मोठे विधान केले आहे. “गर्दीच्या ठिकाणी राज्यात मास्क सक्ती करण्याचा विचार असून आज मुख्यमंत्र्याच्या बैठकीत त्यावर निर्णय होणार आहे, असे टोपे यांनी सांगितले आहे.

डॉ. राजेश टोपे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज सायंकाळी मुख्यमंत्र्यांची राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत एक बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यात मास्क सक्ती करावी कि नाही याबाबत चर्चा केली जाणार असून त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. महाराष्ट्रात सध्या काळजी करण्यासारखी परिस्थिती नसल्याचेही टोपे यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले, आम्ही रोज 25 हजारपर्यंत टेस्टिंग करत आहोत. या टेस्टिंगचे प्रमाणही वाढवत आहोत. सध्या आपले राज्य सेफ झोनमध्ये आहे. आज 929 ॲक्टिव्ह केसेस आहेत. पर मिलियनमध्ये आपण खूप कमी आहोत. दर लाखामागे राज्यात 7 केसेस आहेत. टेस्टिंग वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यासोबतच ट्रॅकिंग सुद्धा आम्ही करणार आहोत. पॉझिटिव्ह केसेसचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात येईल. लसीकरण करण्यात आपण खूप पुढे आहोत.

नव्या कोणत्याही व्हायरसची माहिती नाही – टोपे

यावेळी डॉ. टोपे यांनी नव्या कोरोनाबाबत माहिती नसल्याचे सांगितले. तसेच 6 ते 12 वयोगटासाठी नव्याने लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. नियमावली आली की लगेचच लसीकरण सुरु होईल. प्रिकॉशन डोसमध्ये सुद्धा आम्ही गती वाढवत आहोत. हेल्थ वर्कर्सची संख्या लवकर वाढण्यात येईल. खाजगी ठिकाणी देखील उपलब्ध करण्यात येईल, असे डॉ. टोपे यांनी सांगितले.