रक्षाबंधन – बहीण भावाच्या नात्याचा गोड सण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपला भारत देश हा धार्मिक संस्कृतीचा देश असून आपण अनेक सण मोठ्या उत्साहात पार पाडत असतो. असाच एक सण म्हणजे रक्षाबंधन… रक्षाबंधन हा सण नारळी पौर्णिमा या दिवशी साजरा करण्यात येतो. रक्षाबंधन म्हणजे बहिण- भावाच्या प्रेमाचे अतूट बंधन.. . हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस मानला जातो ! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. राखी म्हणजे बहिणीच्या रक्षणाचे वचन समजण्यात येते.

राखी हा नुसता धागा नसून ते बहीण भावाच्या नात्याचे बंधन असते. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधून तिच्या रक्षणाचे, तसेच अडी अडचणीच्या प्रसंगी बहिणीच्या सोबत खंबीर पने उभे राहण्याचे वचन घेत असते. बहीण भाऊ एकमेकांपासून कितीही लांब असले तरी या पवित्र सणाला बहीण राखी बांधायला आपल्या भाऊरायाकडे जातेच किंवा भाऊ स्वतः भाऊ हा स्वतः जाऊन आपल्या बहिणीच्या हातून राखी बांधून घेत असतो.

बहिणीने भावाला बांधलेली राखी ही कोणत्याही प्रकारची असू शकते. राखी सोन्याची आहे की चांदीची, रंगीबेरंगी आहे कि साधी, याला महत्त्व नसते. राखीची किंमत किती आहे यालाही महत्व नसते. तर महत्व असते बहीण भावाच्या अतूट नात्याला.. राखी ही सध्या धाग्याची जरी असली तरी सुद्धा त्या राखीला खूप महत्व आहे. रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे, रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या शुद्ध प्रेमाचा वाहता निर्झर! भाऊ आणि बहिण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक आहेत हा संदेश देणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीची अमूल्य देन आहे.