हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रमजान महिना मुस्लिम बांधवांमध्ये अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात चंद्राच्या दर्शनाला मोठं महत्त्व आहे. रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांकडून रोजा म्हणजेच उपवास धरला जातो. रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी चंद्र दिसल्यानंतर रमजान ईद (Ramadan Eid 2023) साजरी केली जाते. रमजान ईद या दिवसाला ‘ईद-उल-फित्र’ असेही म्हणतात. फित्र म्हणजे दान करणे. म्हणूनच रमजान ईद च्या दिवशी अन्नाच्या रुपात दान केले जाते. परंतु रमजान ईद साजरा करण्यामागे नेमका काय इतिहास आहे हे तुम्हांला माहित आहे का? चला आज आपण त्याबाबत जाणून घेऊया……
ईद हा इस्लाम धर्माचा मुख्य सण आहे. असे मानले जाते की या दिवशी प्रेषित हजरत मुहम्मद यांनी बद्रच्या युद्धात विजय मिळवला होता. या आनंदात लोक दरवर्षी ईद साजरी करतात. 624 मध्ये पहिल्यांदा ईद-उल-फित्र साजरी करण्यात आली. रमजान ईदला शांती आणि बंधुभावाचा सण म्हणतात. ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव सकासकाळी नमाज अदा करतात आणि शांततेसाठी अल्लाहकडे प्रार्थना करतात. असं मानले जाते की अल्लाह या दिवशी आपल्या भक्तांना निराश करत नाहीत.
भारतात ईद कधी ? Ramadan Eid 2023
रमजान ईद या सणाची नेमकी तारीख अर्धचंद्राच्या दर्शनाने ठरवली जाते. इस्लामिक कॅलेंडरमध्ये प्रत्येक महिना हा 29 किंवा 30 दिवसांचा असतो. चंद्रोदयापासून हे दिवस मोजले जातात. भारतात चंद्र आज दिसण्याची शक्यता असून रमजान ईद उद्या म्हणजेच २२ एप्रिलला साजरी केली जाईल. ईदच्या दिवशी मुस्लीम बांधव नवे कपडे घालून मशिदीत जातात. यादिवशी शिरखुर्मासारखे गोड पदार्थ घरात बनवले जातात. रमजान ईदच्या दिवशी दान करायला सुद्धा मोठं महत्त्व आहे.