साखरवाडी क्रांतीकारकांची भूमी, पाठीत खंजीर खुपसला तरी मी खचलो नाही : प्रल्हादराव पाटील- सांळुखे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण प्रतिनिधी |अनमोल जगताप
साखरवाडी ही क्रांतीकारकांची भूमी असून आ. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी गोड बोलून तर कधी शरद पवारांकडे जात, माझ्या मुलाला पुण्यात बोलावून तुम्हाला कारखाना वाचवायला मदत करतो असे सांगितले. पण आम्ही उठून आलो की मदत करणाऱ्यांना सांगायचे की पैसे बुडतील, देऊ नकोस. हा कारखाना कवडीमोल किंमतीला श्री दत्त इंडियाला दिला आणि माझ्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा गंभीर आरोप करीत मी खचलो नसल्याचा इशारा जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी रामराजेंना दिला आहे.

माढा मतदार संघाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत साखरवाडी/पिंपळवाडी जिल्हा परिषद गटात झालेल्या बैठकीत प्रल्हादराव साळुंखे- पाटील बोलत होते. यावेळी विश्वासराव भोसले, अॅड. नरसिंह निकम, युवानेते विक्रमसिंह भोसले, धनंजय साळुंखे पाटील, बजरंग गावडे, अमित रणवरे, उत्तमराव भोसले,यांच्यासह साखरवाडी गटातील गावचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रल्हादराव साळुंखे- पाटील म्हणाले, साखरवाडी- पिंपळवाडी येथे परिवर्तनाचा मेळावा असून येणाऱ्या काळात फलटण तालुक्यात परिवर्तन अटळ आहे. त्याची सुरुवात फलटण नगरपालिका निवडणुकीपासून सुरू करा, असे मी खा. रणजितसिंह यांना वडिलकीच्या नात्याने दिला आहे. सध्या खा. रणजितसिंह यांच्या नेतृत्वाखाली बदलाचे वारे वाहत आहे, आता त्याची सुरुवात साखरवाडीने करावी. रामराजेंनी मला, आपल्याला धोका दिला आहे, असे सांगत, आता दोन वर्षे गप्प होतो, पण आता गप्प बसणार नाही. रामराजे तुम्ही हा कारखाना काढून घेतला, खालच्या पातळीवर जाऊन माझे व शेतकऱ्यांचे जीवन उध्वस्त केले, असा आरोप प्रल्हाद पाटील यांनी रामराजेंवर केला.

खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर म्हणाले, नको नको ते रामराजेंनी केले आणि प्रल्हादराव साळुंखे पाटील, विक्रमसिंह भोसले यांना अडचणीत आणले. पण आता मी तुमच्याबरोबर असून आता आपण एकत्र लढू. आता आपला एकच पक्ष तो म्हणजे विकास. रामराजे तुम्ही एवढी कटकारस्थान केले की शकुनीसुध्दा तुमच्यासमोर लाजेल. आता आपल्याला सर्वच्या सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागा निवडून आणायच्या असून सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन केले आहे.

प्रल्हादराव साळुंखे-पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार
फलटण श्रीराम कारखान्यात सभासदांचा रुबाब असायचा. पण आता त्या शेतकऱ्यांना कोणीच विचारत नाही, तुमच्या आजोबांनी काढलेला कारखान्यासाठी 10-15 कोटी रुपयांची गुंतवणूक व्यापाऱ्यांनी दिली होती. व्यापाऱ्यांना ते पैसे माघारी मिळाले नाहीत. तुमच्यात राजकीय इच्छा शक्ती आहे, तर साखरवाडी सोडून श्रीराम कारखाना 17-18 वर्षांसाठी चालवायला करून प्रायव्हेट लिमिटेड केली. रामराजेंनी लक्षात ठेवावे मी अजून खचलो नाही. खा. रणजितसिंहांनी दिल्लीत मनावर घेतले तर दत्त इंडियाला माघारी पाठवू असे पाटील यांनी सांगितले. काही दिवसातच मी भाजपमध्ये प्रवेश करणार असून सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला विजयी करण्यासाठी आत्ताच मनाशी खूणगाठ बांधा, असे आवाहन प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी केले.