माढातून लोकसभा लढवणार असल्याची चर्चा
सातारा प्रतिनिधी
देशात आणि राज्यात लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन विविध नेत्यांचे पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम जोरात चालू आहेत. सातारा जिल्ह्यात सुद्धा अशा घटना घडत असून फलटणचे युवा नेते व काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी समर्थकांसह सोमवारी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
दरम्यान, माढ्यातून उमेदवारीसाठी त्यांचे नाव भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डाकडे गेले आहे. त्यामुळे मंगळवारी माढ्याचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. माढ्यात नाट्यमय घडामोडी सुरू असतानाच फलटणचे युवा नेते रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी शनिवारी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारी सायंकाळी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी ना. चंद्रकांत पाटील, ना. गिरीश महाजन, ना. सुभाष देशमुख, ना. विनोद तावडे, ना. सदाभाऊ खोत, माजी खासदार रणजितसिंह मोहिते- पाटील, आ. प्रशांत परिचारक, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.