रत्नागिरीला निसर्ग चक्रीवादळाचा पहिला तडाखा, मदतकार्य सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रत्नागिरी । निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली असून रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. किल्ला परिसरात वृक्ष कोसळून पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच किनारपट्टी भागातील नारळ आणि सुरुची झाडे मोडून पडली आहेत. राजिवडा, मांडवी किनाऱ्यावरही झाडांची पडझड झाली आहे. संगमेश्वर तालुक्यात देवरुख येथे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तर ‘बसरा स्टार’ हे व्यापारी जहाज वादळात अडकले असून जहाजाला सुखरूप मुंबईच्या किनाऱ्यावर आणण्यासाठी मदतकार्य हाती घेण्यात आलं आहे.

सध्या रत्नागिरीत निसर्ग चक्रीवादळ घोंगावत असून या वादळाच्या तडाख्यात एक व्यापारी जहाज सापडले आहे. या जहाजाला मुंबई किनाऱ्यावर यायचे होते. पण रत्नागिरीजवळील मिरकरवाडी भागात हे जहाज जोरदार वादळात व खवळलेल्या समुद्रात अडकून पडले. त्यांनी वरळीतील तटरक्षक दलाच्या समुद्री बचाव केंद्राला मदतीचा संदेश पाठवला. त्यानंतर तटरक्षक दलाने त्या परिसरातील नौकायान मंत्रालयाच्या बचाव नौकेला विनंती केली. त्या विनंतीवरून बचाव नौका तिथे पोहोचली. ‘टोइंग’ प्रकारची ही नौका आता या व्यापारी जहाजाला हळूहळू मुंबईत आणत आहे.

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय.खारेघाट रोड येथील काशी विषश्वेवर मंदिराच्या बाजूला वादळामुळे झाड मध्येच तुटले. गुहागर, दापोली, मंडणगड आणि रत्नागिरीत हा मुसळधार पाऊस कोसळतोय. हा निसर्ग चक्रीवादळाचा परिमाण असून वाऱ्याचा वेगही वाढलाय. ताशी ८० ते १०० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. संगमेश्वरमधील देवरुखमध्ये देखील पाऊस आणि वाऱ्यानं जोर धरला आहे. देवरुखमधील भंडारवाडीत झाड कोसळून घराचं नुकसान झाले आहे.

निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम किनारपट्टीपासून ५० किमी दूर असलेल्या देवरुखातही जाणवत आहे. काल मध्यरात्रीपासून परिसरात रिमझिम पाऊस सुरु होता. तर सकाळी ६ वाजल्यापासून पावसानं जोर धरला असून आता पावसासोबत वाराही वेगानं वाहतोय. शहरातील भंडारवाडी इथं वाऱ्यानं एक वृक्ष मुळासकट उन्मळून पडलाय. त्यामुळे घरांचं नुकसान झाले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment