राऊत बरसले आता फडणवीस गरजणार : बेळगावकर कुणाचं ऐकणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : बेळगावातील मराठी बांधवांना मदत करता येत नसेल तर किमान मराठी मतदारांमध्ये तोडफोड करु नका, या संजय राऊत यांच्या आवाहनानंतर भाजप नेते नितीन गडकरी यांचा बेळगाव रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे. याची अधिकृत घोषणा झाली नसली तरी गडकरींचा दौरा रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, त्याऐवजी आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी बेळगावात भाजपच्या प्रचारासाठी येणार असल्याची माहिती समोर येत आहे. अगोदर राऊत बरसले आहेत आता फडणवीस कसे गरजणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी, तर कॉंग्रेसतर्फे आमदार सतीश जारकीहोळी रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेतर्फे के. पी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र मराठी मतांची विभागणी टाळण्यासाठी त्यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर शिवसेनेने महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे बेळगाव पोटनिवडणुकीची लढत तिरंगी झाली आहे.

नितीन गडकरी हे मोठे नेते आहेत. ते केवळ विदर्भाचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यामुळे नितीन गडकरी यांनी बेळगावातील लोकसभा पोटनिवडणुकीत मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची बेईमानी करु नये, असे संजय राऊत यांनी सांगितले.

राष्ट्रवादी किंवा शिवसेना इथे मराठी माणसाच्या विरोधात प्रचार करणे शक्यच नाही. इतकंच कशाला काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते इथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार करतील असं मला वाटत नाही. कारण सीमा प्रश्न आणि इथल्या मराठी माणसाशी आपण एका भावनेनं बांधले गेले आहोत. पण भाजपचे लोक आहेत त्यांचा या चळवळीशी तसा संबंध नाही. भावनिक गुंतवणूक नाही. पण मराठी म्हणून तरी इथल्या बांधवांच्या विरोधात जाण्याचे पाप तुम्ही करू नका, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Leave a Comment