व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

रवी राणा यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल; पालिका आयुक्त शाई फेक प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणावरून अमरावती महानगर पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार काल घडला आहे. या प्रकरणात आमदार रवी राणा यांच्यासह 10 जणांवर कलम 307 अंतर्गत हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरावतीमध्ये असलेल्या राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. हा पुतळा महानगरपालिकेने हटवला. त्यानंतर अमरावतीत पुतळा हटवू नये अशी मागणी करतात काही संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी करण्यात आलेल्या आंदोलनावेळी रवी राणा, नवणीत राणा हे आघाडीवर होते.

त्यानंतर काल या पुतळा प्रकरणावरून महानगरपालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर महिलांच्यावतीने शाई फेकण्यात आली. कालच्या घडलेल्या शाई फेक प्रकरणावरून रवी राणा यांच्यासह दहा जनावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे राणा यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता आहे.

काय म्हणाल्या खासदार नवणीत राणा?

अमरावती येथील आयुक्तांवरील शाईफेक प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार रवी राणा आणि खासदार नवणीत राणा यांनी प्रतिक्रीया दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढल्यामुळे संतापलेल्या शिवप्रेमींनी शाईफेक केली, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी आपण दिल्लीला असल्याचे रवी राणा यांनी सांगितले. तर आमदार नवणीत राणा यांनी हा शिवप्रेमींचा राग असल्याचे म्हंटले.