कृषी कायद्यावर विरोधी पक्षांची भूमिका दुतोंडी ; केंद्रीय कायदा मंत्र्यांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. त्यातच केंद्र सरकारचे मंत्री आणि शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकांमधून अद्याप तोडगा निघालेला नाही. याच पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांनी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. शेतकरी आंदोलनात विरोधक फक्त विरोधासाठी विरोध करत आहेत असा आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. शरद पवारांच्या पत्राची आठवण करुन देत त्यांनी काँग्रेस, टीडीपी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्या पक्षांवर टीका केली आहे. आम्ही शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि विरोधक आता दुटप्पी भूमिका घेत आहेत कारण मोदी सरकारवर टीका करायची आहे. असा गंभीर आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला आहे.

शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रावरुन साधला निशाणा-

शरद पवार यांनी आपल्या कृषी मंत्रिपदाच्या कार्यकाळात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं. त्यातील शिला दीक्षित यांना लिहिलेलं पत्र वाचून दाखवत रविशंकर प्रसाद यांनी पवारांवर दुटप्पीपणाचा आरोप केला आहे. तेव्हा पवार यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात कृषी कायद्यात बदल गरजेचा असल्याचं म्हटलं होतं. त्याचबरोबर खासगी गुंतवणूक आणि शेतकऱ्यांना आपलं उत्पादन कुठेही विकण्याचा अधिकार मिळावा असं लिहिण्यात आलं होतं.

शरद पवार तुम्ही अनुभवी नेते आहात. अनेक वर्ष तुम्ही मुख्यमंत्री आणि केंद्रांत मंत्री होता. तेव्हा तुम्ही कृषी धोरणातील सुधारणांबाबत मोदी सरकारपेक्षा जास्त आग्रही होता. मग आज विरोध का करता आहात? याला आपले अस्तित्व राखण्यासाठी शुद्ध राजकारण का म्हणू नये, असा सवाल प्रसाद यांनी विचारला आहे.

केजरीवालांनाही सुनावले खडेबोल-

२३ नोव्हेंबर २०२० ला अरविंद केजरीवाल सरकारनं दिल्लीत नोटीफिकेशन काढलं होतं. मग आज विरोध आणि तेव्हा नोटीफिकेशन अशी भूमिका का? असा प्रश्न प्रसाद यांनी केजरीवालांना विचारला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’