एकनाथ खडसेंना दिलासा; EDने हायकोर्टात दिली ‘ही’ हमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. येत्या सोमवारपर्यंत खडसे यांच्यावर अटकेसारखी कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही, अशी हमी ईडीनं मुंबई उच्च न्यायालयात  (Bombay High Court) दिली आहे.

फडणवीस सरकारच्या काळात पुण्यातील भोसरी येथील भूखंड खरेदीमुळं खडसे वादात सापडले होते. त्यातून त्यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. कालांतरानं त्यांच्यावरील आरोपांची चौकशी होऊन त्यांना क्लीन चिटही देण्यात आली होती. या व्यवहारांसह अन्य काही प्रकरणांत ईडीकडून खडसे यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी ईडीनं त्यांना समन्स बजावलं आहे. ईडीनं कुठलीही कठोर कारवाई करू नये म्हणून खडसे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर ईडीनं प्रतिज्ञापत्र दाखल करून त्यांच्या याचिकेला उत्तर दिलं होतं. या प्रकरणी न्यायमूर्ती संभाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढं आज सुनावणी झाली.

खडसे हे तपासात सहकार्य करत असतील आणि चौकशीच्या समन्सचे पालन करत असतील तर त्यांना अंतरिम दिलासा का देऊ नये? त्यांना काही दिवसांसाठी संरक्षण दिलं तर आभाळ कोसळणार आहे का? अशी विचारणा न्यायमूर्ती संभाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने ईडीला केली. त्यानंतर ईडीनं सोमवारपर्यंत कुठलीही कठोर कारवाई न करण्याची हमी दिली. या हमीची न्यायालयानं नोंद घेतली आहे. खडसे यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी येत्या सोमवारी 25 जानेवारीला ठेवण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment