Thursday, October 6, 2022

Buy now

नवरात्री विशेष : माहूर गडाची रेणुका माता

नऊ दिवस नऊ शक्तीस्थळे | साडेतीन शक्तिपीठातील पूर्णपीठ म्हणून माहूर गडाला ओळखले जाते. माहूर गडावरील रेणुका मातेचे मंदिर किल्ल्यामध्ये असल्यानेच या परिसराला माहूरगड असे म्हणतात. या ठिकाणी असणारी रेणुका मातेची मूर्ती अत्यंत मनमोहक आहे. त्याच प्रमाणे हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते.

तेराव्या शतकात यादव राजाने बांधलेले मंदिर आज देखील नव्या सारखे भासते. तर या मंदिराला हजारो वर्षांचा इतिहास देखील आहे. नवरात्रीत या ठिकाणी लाखो भक्तांची गर्दी लोटते. त्याच प्रमाणे नवरात्रीसोबत येथे होणार मकर संक्रातीचा उत्सव देखील मोठा असतो. याच माहूर गडावर दत्त भगवानाचा जन्म झाला होता. या ठिकाणी माता अनुसयेचे देखील मंदिर आहे.

रेणुका नावाच्या राजकन्येचा विवाह शंकराचा अवतार मानला जाणाऱ्या जमदग्नी ऋषी सोबत झाला होता. रेणुका राजकन्या म्हणजेच रेणुका माता होय. रेणुका आणि जमदग्नी ऋषींच्या पोटी भगवान परशुरामाचा जन्म झाला. परशुरामाला भगवान विष्णूचा अवतार मानले जाते. जमदग्नी ऋषींकडे इच्छा पूर्ण करणारी कामधेनू गाय होती. एक दिवस परशुराम आश्रमात नसल्याचे पाहून सहस्त्र अर्जुन नावाचा राजा आश्रमात सेनेसह घुसला. त्याने कामधेनु गायची मागणी जमदग्नी ऋषींकडे केली. मात्र त्यांनी ती गाय देण्यास नकार देताच सहस्त्र अर्जुने त्यांचा वध केला. हा सर्व प्रकार घडल्या नंतर काही वेळाने परशुराम आश्रमात आले. त्यावेळी त्यांनी क्रोधीत होऊन पृथ्वी निःशस्त्र करण्याची शपथ वाहिली.

कोऱ्या भूमीवर आपल्या वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी परशुरामाने एका कावडीच्या पात्रात जमदग्नी ऋषींचे शव ठेवले तर दुसऱ्या कावडीच्या पात्रात माता रेणुकेला बसवले. कावड घेऊन परशुराम माहूर गडावर आले असता त्यांना दत्त भगवानाने माहूर गडावर कोरी जागा दाखवली. या ठिकाणी सर्व प्रथम परशुरामाने बाण मारून कुंड निर्माण केले. त्यातून येणाऱ्या पाण्यात त्याने आपल्या वडिलांच्या शवाला स्नान घातले त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. या अंत्यसंस्काराचे पौरोहित्य स्वतः दत्त भगवानाने केले होते. या अंत्यविधीच्या वेळी रेणुका माता जमदग्नी ऋषींच्या चितेवर सती गेली. आपली आई सती गेल्यावर परशुरामाला आईची खूप आठवण येऊ लागली. तेव्हा आकाशवाणी झाली. तुझी आई तुला भेटण्यासाठी जमिनीतून वर येत आहे. फक्त तू मागे वळून बघू नकोस. मात्र परशुरामाला आईची आठवण सहन झाली नाही. त्यांनी मागे वळून बघितले. तेव्हा रेणुका मातेचे तोंड जमिनीतून वर येत होते. परशुरामाने मागे वळून बघितल्याने रेणुका मातेचे फक्त तोंडच जमिनींच्या वर आले. तेच मातेचे मुख पाषाण रूपात आज माहूर गडावर आहे. त्यामुळे रेणुका मातेच्या फक्त मुखाचीच पूजा केली जाते.