औरंगाबादेत सैराटची पुनरावृत्ती ! सख्या भावानेच केली बहिणीची हत्या

औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यात सैराटची पुनरावृत्ती झाली आहे. प्रेम विवाह केल्यामुळे अल्पवयीन भावाकडून मोठ्या बहिणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. यादरम्यान पतीने पळ काढल्यामुळे त्याचा जीव वाचला. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. घटनेमुळं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमविवाह केला म्हणून सख्या भावानेच 19 वर्षीय मुलीची गळ्यावर कोयत्याचे वार करुन निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वैजापूर तालुक्यातील लाडगाव शिवारात ही घटना घडली. किशोरी मोटे(19) असे हत्या झालेल्या विवाहीतेचे नाव आहे. किशोरीने सहा महिन्यापूर्वी पुण्यातील आळंदी येथे प्रेमविवाह केला होता. काही दिवसांपूर्वीचे ते लाडगाव शिवारात राहण्यासाठी आले होते. ही माहिती मिळताच भावाने आईसोबत लाडगाव गाठलं.

यावेळी बहिणीला पाहून त्याला राग अनावर झाला आणि त्याने कोयत्याने बहिणीच्या गळ्यावर सपासप वार केले. हा सर्व प्रकार पाहून किशोरीच्या पतीने पळ काढला आणि आपला जीव वाचवला. यानंतर शेजारील काही लोकांना या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपी भाऊ आणि आईला ताब्यात घेतलं आहे.