वार्तांकनावेळी डिवचणाऱ्या रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकाराला मुंबईच्या पत्रकारांनी दिला चोप; व्हिडिओ व्हायरल

मुंबई । आपल्या अतरंगी वार्तांकनासाठी ओळखले जाणारे रिपब्लिकच टीव्हीचे पत्रकार प्रदीप भंडारी यांना मुंबईतील टीव्ही पत्रकारांनी चोप दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये प्रदीप भंडारी यांना इतर पत्रकारांकडून धक्काबुक्की होताना दिसत आहे. मुंबईतील इतर चैनलचे पत्रकार वार्तांकन करताना भंडारी वारंवार त्यांच्या कामात व्यत्यय अनंत त्यानं हिणवत असल्याचा आरोप घटनास्थळावर प्रत्यक्षदर्शी पत्रकारांनी केला आहे. प्रदीप भंडारी यांनी ट्विट करत एनडीटीव्ही आणि एबीपीच्या पत्रकारांचा गुंड असा उल्लेख करत त्यांच्यावर मारहाण केल्याचा उलट आरोप केला आहे.

मुंबईतील पत्रकारांच्या सांगण्यानुसार, भंडारी हे मुंबईतल्या पत्रकारांना चाय बिस्कुट पत्रकार म्हणून हिणवत होते, थोडक्यात तुम्ही खरी पत्रकारिता करत नाही, ती आम्ही करतो असं ते डिवचत असल्याचं काही पत्रकारांनी सांगितलं. तसंच अत्यंत आक्रस्ताळ्या पद्धतीनं रिपोर्टिंग करताना रिपब्लिकचे पत्रकार अन्य पत्रकारांच्या कामात प्रचंड व्यत्यय आणत होते अशी चर्चाही मुंबईतल्या पत्रकारांच्या वर्तुळात होती. या सगळ्याचा उद्रेक गुरूवारी झाल्याचं बघायला मिळालं.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत प्रदीप भंडारी यांना धक्काबुक्की होताना दिसत आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात शाब्दिक चकमकही सुरु होती. पोलीस पोहोचण्याआधीच हा वाद सुरु झाला होता. वाद वाढल्यानंतर पोलीस आणि इतर सहकारी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. हा वाद नेमका कशामुळे झाला याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

एनडीटीव्हीच्या पत्रकारांनीही ट्विटरच्या माध्यमातून आपली बाजू मांडली आहे. एनडीटीव्हीच्या सौरभ गुप्ता यांनी समोरच्या बाजुनं शिवीगाळ व गैरवर्तणूक होत होती, परंतु एनडीटीव्हीच्या पत्रकारांनी परिस्थिती शांतपणे हाताळल्याचे म्हटलं आहे. तसंच, भंडारी यांनीच दाखवलेल्या व्हिडीओमध्येही ते स्पष्ट असल्याचं गुप्ता यांनी म्हटलं आहे.

या घटनेनंतर प्रदीप भंडारी यांनी ट्विट केलं असून ड्रग्ज रॅकेटमधील मोठी नावं समोर आणल्याने आपल्यावर हल्ला झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “महाराष्ट्रात सत्य बोलण्याची काय किंमत आहे माहिती आहे का? ड्रग्ज रॅकेटमधील प्रसिद्ध चेहरे समोर आणल्याने यांचा संताप वाढत आहे. जेव्हा पोलिसांमार्फत काही झालं नाही तर आज एनडीटीव्ही आणि एबीपीच्या गुंड पत्रकारांना माझ्यासोबत हाणामारी करण्यासाठी पाठवलं. पण मी माघार घेणाऱ्यांपैकी नाही”. या सगळ्या प्रकरणातून आता पत्रकारांमध्येही गट पडत असल्याची व अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन हमरीतुमरीवर उतरण्याची स्पर्धा होत असल्याची चर्चा समाजमाध्यमांमध्ये रंगली आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

You might also like