Sunday, May 28, 2023

अर्णव गोस्वामींनी TRP वाढविण्यासाठी दिली लाखोंची लाच; मुंबई पोलिसांचा कोर्टात खुलासा

मुंबई । (TRP Scam) टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) अहवाल सादर केला. रिपब्लिक टेलिव्हीजन नेटवर्कचे संपादक अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांनी टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट (TRP) वाढविण्यासाठी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलचे (BARC) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना लाखो रुपयांची लाच दिल्याचा गौप्यस्फोट मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात केला आहे.

मुंबई पोलिसांच्या या अहवालामुळे आता अर्णव गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. “पार्थो दासगुप्ता ‘BARC’चे सीईओ असतानाच्या काळात अर्णव गोस्वामी आणि इतर आरोपींनी रिपब्लिक भारत हिंदी वृत्तवाहिनी आणि रिपब्लिक टीव्ही (Republic TV) इंग्रजी वृत्तवाहिनीच्या टीआरपीत चुकीच्या पद्धतीनं वाढ करण्यात आली. TRP वाढवून दाखविण्यासाठी गोस्वामी यांनी दासगुप्ता यांना अनेकदा लाखो रुपयांची लाच दिली, असं चौकशीत समोर आलं आहे”, अशी माहिती मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) न्यायालयात दिली.

पार्थो दासगुप्ता यांना मुंबई पोलिसांनी गेल्याच आठवड्यात अटक केली असून त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्यात पहिल्यांदाच अर्णव गोस्वामी यांचं नाव थेट कोर्टात उघडपणे घेतलं आहे. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालात मात्र आरोपी म्हणून अर्णव गोस्वामी यांचं नाव नमूद केलेलं नाही. दरम्यान, गोस्वामी यांच्याकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’