धामणेर-महाबळेश्वर रस्त्याच्या कामात ५० कोटींचा भ्रष्टाचार; ठेकेदार, अभियंत्यांनी रस्त्याचा प्रकारच बदलला

सातारा प्रतिनिधी | सार्वजनिक बांधकाम विभागाने महाबळेश्वर ते धामणेर या ३१० कोटी रुपयांच्या बांधकामात टेंडर बाजुला ठेवून मनमानी केली आहे. अंदाज पत्रकात केळघर घाटातील रस्त्याचा प्रकार सिमेंट काँक्रीटचा असताना काळाकडा ते महाबळेश्वरपर्यंत डांबरी रस्ता करण्यात आला आहे. ठेकेदाराचे उखळ पांढरे करुन भरगच्च टक्केवारी मिळवण्याकरीता उपअभियंता निकम यांनी हे नियमबाह्य काम केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गडोख नामक ठेकेदाराला आजपर्यंत १०० कोटी रुपयांचे बिल काढण्याकरीता सार्वजनिक बाधकाम विभागाचे अभियंता सामील असून केळघर घाटात टक्केवारीकरीता यानिमित्ताने केळघर घाटात बोकाळलेला भ्रष्टाचार समोर आला आहे. रोड वे सोल्युशन इंडीया या गडोखच्या कंपनीला सिमेंट काँक्रीटचा रस्ता बांधण्यासाठी ३१० कोटी रुपयांचे टेंडर मिळाले होते. मात्र टक्केवारीत अडकलेल्या लोकांनी महाबळेश्वर ते धामणेर अंदाजपत्रकाला मुठमाती देत ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि गुणवत्तेकरिता नियुक्त इंडिपेंडंट कंपनीने मिळून सदर कामात ५० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे.

केळघर घाटात बांधण्यात येणाऱ्या रस्त्याचा प्रकार अंदाजपत्रकात निराळा आणि टेंडरमध्ये निराळा ठेवत ५० कोटी रुपयांचा गफला या कामात केला गेला आहे. सदर प्रकरणाची कागदपत्रे माहिती तक्रारदारांनी माहिती अधिकाराखाली मागवली असून या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”