औरंगाबाद | सध्या वाळूज-रामराई या रस्त्याचे खडकीकरण झाले असून डांबरीकरणाचे काम रखडले आहे. यासाठी पावणेदोन कोटींचा निधी देण्यात आला असूनही हे काम रखडल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने ठेकेदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. दिलेला वेळेमध्ये काम पूर्ण न केल्यामुळे काळ्या यादीमध्ये टाकण्याचा इशारा ठेकेदाराला नोटीसद्वारे देण्यात आला आहे.
शासनाच्या क्लस्टर योजनेअंतर्गत वाळूज-रामराई रोडवर तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाला अडीच वर्षांपासून प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली होती. या क्लस्टर योजनेतून पावणे दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. इन्फ्रा कन्स्ट्रक्शन इंजिनीयर आणि कॉन्ट्रॅक्टर्स या नाशिकच्या कंपनीला या रस्त्याचे काम देण्यात आले होते. सध्या या रस्त्याचे खडकीकरणाचे काम पूर्ण झाले असून डांबरीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम महिन्यापासून रखडले आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी या कामाची पाहणी केली होती. यावेळी वाळूजचे सरपंच सईदाबी पठाण, उपसरपंच योगेश आरगडे, माजी सभापती मनोज जैस्वाल, सदस्य सचिन काकडे, नदीम झुंबरवाला, अमजद पठाण आदींनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गोंदावले यांनी रस्त्याचे काम केल्याची तक्रार केली होती. याबाबत रस्त्याचे काम करणारे प्रकाश मते यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी दोन वेळा या रस्त्याचे काम ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व नागरिकांनी अडवल्यामूळे रस्त्याचे काम रखडले असल्याचे सांगितले.