फडणवीसजी आपल्या काळात पेट्रोलवरील कर 300 टक्क्यांनी वाढवला; रोहित पवारांनी मांडली आकडेवारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल व डिझेलमधील वाढलेल्या दर व करामुळे जनता चांगलीच हैराण झाली आहे. दरम्यान केंद्र सरकारच्या सध्याच्या याबाबतच्या भूमिकेविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील मुख्यमंत्र्यांच्या परिषदेमध्ये आपली भूमिका मांडली. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. फडणवीसांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे मुख्यमंत्री ठाकरेंच्या भूमिकेचे समर्थन करत फडणवीसांना त्यांच्या 2014 मधील कार्यकाळातील इंधनावरील सेसवरून टोला लगावला आहे.

रोहित पवार यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या हिताची बाजू जोरकसपणे मांडताच राज्यातील भाजप नेत्यांचा मात्र, तिळपापड झाला. राज्याच्या हिताच्या गोष्टी बोलण्याची वेळ येते तेंव्हा काही न बोलणारे विरोधी पक्षनेते फडणवीस साहेब लगेच राज्य सरकारवर टिका करायला आतुर झालेलेच असतात. राज्य शासनावर टिका करण्याआधी त्यांनी आपल्या कार्यकाळातील पेट्रोल-डिझेलवरील कर रचना बघायला हवी आणि राज्य शासनाची आजची भूमिका समजून घ्यावी, ही विनंती.

फडणवीस साहेब आपण सत्तेत असताना पेट्रोल-डिझेलवर जो VAT आकाराला जात होता तोच 25 टक्के होता तर आज 21 टक्के आकारला जात आहे. राज्य सरकार आकारत असलेल्या सेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या कार्यकाळात आकारल्या जात असलेल्या सेसपेक्षा आज आकारला जात असलेला सेस नक्कीच कमी आहे. आपण सत्तेत असताना पेट्रोलवर 11 रुपये सेस आकारला जात होता. 2014 पूर्वी आघाडी सरकारच्या काळात पेट्रोलवर प्रति लिटर 1 रुपया आकारला जाणारा सेस 11 रुपर्यंत फडणवीस साहेब आपणच नेला होता.

डिझेलवरील कराच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज डिझेलवर केंद्राचा कर 22 रुपये आहे तर राज्याचा कर 20 रुपये आहे. त्यामुळं डिझेल दरवाढीसंदर्भात राज्याचा प्रश्नच येत नाही. पेट्रोलवरील कराच्या बाबतीत बोलायचं झालं तर केंद्राचा कर 28 रुपये आणि राज्याचा कर 32 रुपये आहे. राज्य शासन टक्केवारीमध्ये vat आकारत असल्याने राज्याचा कर हा सध्याच्या स्थितीला जास्त दिसतो, परंतु कच्च्या तेलाच्या किंमती कमी होताच राज्याचा कर आपोआप कमी होत असतो, याची माहिती फडणवीस साहेबांसारख्या अभ्यासू व्यक्तिमत्वाला नक्कीच माहीत असेल. त्यामुळे इंधन दरवाढीसाठी राज्यसरकारला कारणीभूत ठरवणे पूर्णतः चुकीचे आहे.

भाजप है तो मुमकीन है !

रोहित पवार यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे भाजपवरही निशाणा साधला आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हंटले आहे की, युपीए सरकारच्या काळात 2014 मध्ये कच्च्या तेलाची किंमत 105 डॉलर्स प्रति बॅरल असताना पेट्रोलची किंमत 78 रुपये प्रति लिटर होती. आज भाजप सरकारच्या काळात कच्च्या तेलाची किंमत 102 डॉलर्स प्रति बॅरल असताना पेट्रोलची किंमत मात्र 120 रुपये प्रति लिटर आहे. भाजपा सरकारच्या काळात तर कच्च्या तेलाची किंमत 17 डॉलर्स प्रति बॅरल पर्यंत घसरली होती, परंतु तेंव्हाही पेट्रोलची किंमत 80 रुपये प्रति लिटरच होती. युपीए सरकारच्या काळात कच्च्या तेलाची किंमत जास्त असताना पेट्रोलची किंमत कमी असायची आणि आज भाजपा सरकारच्या काळात कच्च्या तेलाची किंमत कमी असताना पेट्रोलची किंमत मात्र जास्त आहे, हे विपरीतच नाही का? परंतु यात आश्चर्य करण्यासारखं काही नाही, कारण… ‘भाजप है तो मुनकीन है.’ असेही पवार यांनी म्हंटले आहे.