आजोबांवरील टिकेनंतर रोहित पवारांचे प्रत्युत्तर; सदाभाऊंचा ‘तो’ व्हिडिओ केला शेअर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सदाभाऊंचा समाचार घेतला आहे. ज्यांच्या दुधातच आहे पाणी त्यांची कशी असेल शुद्ध वाणी? अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

रोहित पवार यांनी सदाभाऊ खोत यांचा एक विडिओ शेअर केला आहे. ज्यात सदाभाऊ खोत राजू शेट्टी यांच्या दूध आंदोलनाबाबत बोलत आहेत. दुधात काय भेसळ असते? किती पाणी असतं मला चांगल्यानं माहिती आहे? असं सदाभाऊ खोत या व्हिडिओमध्ये बोलताना दिसतात. तोच व्हिडिओ आमदार रोहित पवारांनी ट्विट केला असून ज्यांच्या दुधात पाणी आहे, त्यांची वाणी कशी काय शुद्ध असू शकते, असा पलटवार त्यांनी केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला. सदाभाऊंना आमदारकी टिकवायची आहे म्हणून त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. त्यांचा बोलविता धनी देवेंद्र फडणवीस हेच आहेत. सदाभाऊची गत पाण्याविना मासोळी अशी झाली आहे. शरद पवारांनी काय केलं ते सोडा, पण सदाभाऊंच्या बुडाला आग का लागली हा विषय आहे असे मिटकरी म्हणाले.

सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले-

शरद पवार यांनी आपलं आडनाव बदलून आगलावे करावे. जाईल तिथे आग लावायची आणि दुसऱ्या घराला आग लावायला जायचं. त्यांचं आयुष्य हे आग लावण्यातच, आणि काड्या करण्यात गेलं त्यामुळे त्यांनी आपलं आडनाव पवारांऐवजी आगलावे असे करावं अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली