रामदास आठवलेंचा अपेक्षाभंग! मित्रपक्ष भाजपाने एकही तिकीट न दिल्यानं केलं नाराजीचं ट्विट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात २१ मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या ९ जागांच्या निवडणुकीत भाजपने ४ पैकी एक जागा रिपब्लिकन पक्षाला देण्यात यावी या मागणीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी भेट घेतली होती. त्यावर विचार करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचं आठवले यांनी सांगितलं होतं. मात्र, भाजपने चारही जागांवर आपले उमेदवार उभे केल्यानं रामदास आठवले यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी ट्विट करत आपण नाराज भाजपवर असल्याचं म्हटलं आहे.

रामदास आठवले यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “महाराष्ट्रात २१ मे रोजी विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होत असून त्यातील एक जागा भाजपाने रिपब्लिकन पक्षाला द्यावी अशी रिपाइंची मागणी होती. मित्रपक्ष म्हणून भाजपाच्या वाट्याला येणाऱ्या चार जागांपैकी एक जागा रिपाइंला न सोडल्याने रिपाइं कार्यकर्ते नाराज आहेत” अशा शब्दात आठवलेंनी भाजपवर नाराज असल्याची जाहीर प्रतिक्रिया दिली.

विधानपरिषदेच्या निवडणूक होणाऱ्या ९ जागांपैकी पैकी ४ जागा भाजपाला येणे निश्चित झाले असून त्यापैकी एक जागा रिपाइंला द्यावी असा आग्रह आठवले यांनी धरला होता. त्यावर भाजपला केवळ ४ जागा मिळणार असून राज्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावे या जागांसाठी चर्चेत आहेत. इच्छुकांची मोठी रीघ लागली आहे. तरीही एक चांगला मित्र पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला एक जागा सोडण्याबाबत निश्चित विचार करू, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आठवले यांनी दिली होती. मात्र जाहीर झालेल्या यादीत रिपाइंला एकही जागा देण्यात आलेली नाही.

भाजपाच्या केंद्रीय समितीने नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अजित गोपछडे, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि गोपीचंद पडळकर या ४ नावांची घोषणा केली. या चौघांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जही दाखल केले.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment