कराड | पळा..पळा..पळा बिबट्या आला असा जोरजोराने धोंडेवाडी फाटा ते काले या रस्त्यांवर एक दुचाकीस्वार मध्यरात्री अोरडत होता. मध्यरात्री दुचाकीस्वारास आपले मरण दिसत होते. कारण चक्क थोड थोडके नव्हे तर एक किलोमीटर अंतर बिबट्याने दुचाकीस्वाराचा पाठलाग करत काले गावात शिरकाव केला होता.
कराड तालुक्यातील काले येथील गंगाराम पाटील यांच्याबाबतीत ही घटना घडलेली आहे. गंगाराम पाटील हे नांदगाव येथे काही कामानिमित्ताने गेले होते. तेथून काले येथे येण्यास रात्रीचे 12 वाजले होते. धोडेंवाडी फाटा येथे दुचाकीवरून आल्यानंतर त्यांना प्राण्याची हालचाल दिसली. मात्र तरस आसावे म्हणून त्यांनी जास्त लक्ष न देता दुचाकी पुढे काले गावच्या रोडला घेतली. तेव्हा पाठीमागून बिबट्या दुचाकी गाडीच्या पाठीमागे लागला होता.
धोडेवाडी फाटा ते काले गावापर्यंत बिबट्याने दुचाकीचा पाठलाग करून गंगाराम पाटील यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुचाकी अत्यंत वेगाने पळविली, मात्र बिबट्यानेही आपला पळण्याचा वेग वाढविला होता. त्यामुळे आपल्यावर बिबट्या हल्ला करणार असेच गंगाराम पाटील यांनी गृहित धरले होते. परंतु सुदैवाने सुखरूप या घटनेतून बचावले आहेत.