Russia Ukraine Crisis : कच्च्या तेलावरच नाही तर सोयाबीन, गहू आणि मक्यावरही घोंगावतेय दरवाढीचे वादळ

नवी दिल्ली । रशियाने युक्रेनविरुद्ध केलेल्या युद्धाच्या घोषणेमुळे कच्चे तेल आणि सोन्याचे भाव तर वाढलेच आहे मात्र त्याबरोबरच गहू, सोयाबीन आणि मका यांच्या किंमतीतही मोठी उसळी आली आहे. रशिया हा गव्हाचा मोठा उत्पादक देश असून आता युद्धामुळे जगभरातील गव्हाच्या पुरवठ्यावर देखील परिणाम होऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गव्हाच्या किंमतीत वाढ झाली आहे.

त्याचप्रमाणे सोयाबीन आणि मक्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेनमधील हे युद्ध पुढे काय स्वरूप घेईल याची कोणालाच कल्पना नाही. म्हणूनच गुंतवणूकदार इक्विटीमधून बाहेर पडत असताना आणि सेफ हेवन ऍसेट्समुळे सोने खरेदी करत असतानाच खाद्यपदार्थांची मागणीही वाढली आहे.

रशिया आणि युक्रेन हे जगातील सर्वात मोठे गहू निर्यातदार आहेत
मक्यानंतर गहू हे जगातील दुसरे सर्वात मोठे धान्य आहे. या धान्याच्या उत्पादनात रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश आघाडीवर आहेत. रशिया 18% पेक्षा जास्त गहू निर्यात करतो. युक्रेन या बाबतीत 5 व्या स्थानावर आहे. जगभरात केवळ हे दोनच देश 25.4% गव्हाची निर्यात करतात. 2019 मध्ये रशियाने जगभरात 60.64 हजार कोटी रुपयांचा गहू निर्यात केला. त्याचबरोबर युक्रेनने 2019 मध्ये 23.16 हजार कोटी रुपयांचा गहू इतर देशांना निर्यात केला आहे.

कृषी मालाची तेजी
युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू झालेल्या युद्धाचा परिणाम अनेक वस्तूंवर झाला आहे. रबराची किंमत 38 आठवड्यांच्या उच्चांकावर गेली आहे. त्याचवेळी सोयाबीनच्या दरात मोठी झेप घेतली असून ते दीड वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर ट्रेड करत आहेत. गव्हाच्या किंमतीत मोठी झेप घेतली असून गेल्या 9 वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर गव्हाची विक्री होत आहे. आणखी एका कृषी कमोडिटी मका (कॉर्न रेट) मध्ये देखील तेजीचे वातावरण आहे आणि किंमती 33 आठवड्यांच्या उच्च पातळीवर पोहोचल्या आहेत.

निकेल आणि अ‍ॅल्युमिनियममध्येही झाली विक्रमी वाढ
प्लॅटिनमच्या दरातही मोठी उसळी आली आहे. सध्या त्याचा दर 14 आठवड्यांच्या उच्चांकावर $1100 प्रति टन असल्याचे सांगितले जात आहे. पॅलेडियमचा दर 24 आठवड्यांच्या उच्चांकावर आहे आणि $2400 oz वर ट्रेड करत आहे. अ‍ॅल्युमिनियमचे दरही आता विक्रमी पातळीवर आहेत, त्यामुळे निकेलच्या किंमती 10 वर्षांच्या उच्चांकावर आहेत.

सोने 13 महिन्यांच्या उच्चांकावर
सोन्याची चमक वाढली आहे. भू-राजकीय जोखीम वाढल्यामुळे, MCX वर सोने 2.15 टक्क्यांनी वाढून 51750 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचले आहे. आजच्या ट्रेडिंगमध्ये सोन्यामध्ये सुमारे 1300 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याने प्रति औंस 1950 डॉलरचा दर गाठला आहे. वाढत्या भू-राजकीय जोखमीमुळे नजीकच्या काळात सोन्याचा दृष्टीकोन खूप मजबूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सोन्याचा भाव अल्पावधीतच 53000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो. त्याचवेळी क्रूडच्या किंमती पेटल्या असून सात वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत.