Russia-Ukraine Crisis: पेट्रोल-डिझेलच्या किंमती 15 रुपयांनी वाढणार ? तज्ञांचे मत जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा चटका आपल्या खिशालाही बसेल. रशिया-युक्रेनमधील तणावामुळे गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमती वाढत होत्या आणि गुरुवारी रशियाने युक्रेनवर हल्ला करताच कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 103 डॉलर्सवर पोहोचल्या. गेल्या अडीच महिन्यांत कच्च्या तेलाच्या किंमती 27 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

गेल्या अडीच महिन्यांत सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही. अशा परिस्थितीत आता उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपताच तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता बळावली आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 103 डॉलर्सवर पोहोचली आहे. यापूर्वी 2014 मध्ये कच्च्या तेलाची किंमत $100 च्या वर गेली होती.

दर इतके वाढू शकतात
3 नोव्हेंबरपासून देशांतर्गत तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. मात्र तेव्हापासून कच्चे तेल प्रति बॅरल $20 पेक्षा महाग झाले आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, जर रशिया-युक्रेन युद्ध दीर्घकाळ चालले तर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 120 पर्यंत जाऊ शकते.

अशा परिस्थितीत देशांतर्गत तेल कंपन्या डिझेल आणि पेट्रोलचे दर प्रति लिटर 15 रुपयांनी वाढवू शकतात. ही वाढ एकाच वेळी न करता दोन-तीन टप्प्यांत केली जाण्याची शक्यता आहे. नैसर्गिक वायूच्या किंमतीही वाढत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत एलपीजी आणि सीएनजीच्या दरातही 10 ते 15 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

किंमती कधी वाढतील
उत्तर प्रदेश आणि पंजाबसह 5 राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर तेल कंपन्या दर वाढवतील, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 10 मार्च रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. निवडणुकीच्या काळात तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलचे दर वाढवत नाहीत, असे चित्र सर्वसाधारणपणे पाहायला मिळते. भाव वाढल्याने सरकारचे राजकीय नुकसान होते.

3 नोव्हेंबर रोजी सरकारने कमी केला होता टॅक्स
केंद्र सरकारने 3 नोव्हेंबर रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. यानंतर अनेक राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील टॅक्सही कमी केला. त्यामुळे दर कमी झाले. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. तेव्हापासून कच्च्या तेलात लक्षणीय वाढ झाली आहे. 3 नोव्हेंबर 2021 रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $80 होती, जी आता प्रति बॅरल $103 च्या वर पोहोचली आहे.

Leave a Comment