अंधेरी पोटनिवडणुकीतील विजयानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, हा विजय म्हणजे….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी बाजी मारली आहे. ऋतुजा लटके याना 60 हजार पेक्षा जास्त मते मिळाली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर नोटाला 12 हजारापेक्षा जास्त मते मिळाली आहेत. या विजयानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत मतदारांचे आभार मानले. हा विजय माझा नसून माझे पती रमेश लटके यांचा आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी त्या काहीशा भावूक झाल्याचे दिसले.

ऋतुजा लटके म्हणाल्या, माझे पती रमेश लटके यांनी आत्तापर्यंत जी काही जनसेवा केली त्याचीच ही पोचपावती आहे. मतदारांनी त्याचीच परतफेड केली आहे. आता अंधेरीचा विकास हाच माझा ध्यास असेल . रमेश लटके यांची जी कामे अर्धवट राहिली आहेत, ती कामे पूर्ण करण्यास माझी प्राथमिकता असणार आहे. अंधारींच्या विकासासाठीच माझा प्रयत्न असेल.

दरम्यान, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांच्यानंतर सर्वाधिक मतदान नोटाला झालेलं पाहायला मिळालं. इतर अपक्षांपेक्षा नोटाला वाढलेलं मतदानामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यावरून ऋतुजा लटके यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. नोटाला झालेलं मतदान हे भाजपलाच मिळालेली मतं आहेत. त्यांच्या मनात सहानुभूतीची भावना असती तर त्यांनी आधीच उमेदवार जाहीर केला नसता”, असा टोला त्यांनी लगावला.