Breaking : सचिन वाझेंना NIA कडून अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. एनआयए च्या 13 तासांच्या चौंकशीनंतर अखेर वाझे यांना अटक केली आहे.

गेल्या महिन्यात जिलेटीनच्या कांड्या असलेली एक स्कॉपिओ कार मुकेश अंबानी यांच्या बंगल्यावर संशयास्पदरित्या सापडली होती. या घटनेनंतर कारचा मालक असलेल्या मनसुख हिरेन यांची पोलिसांकडून चौकशी झाली होती. ही चौकशी सुरू असतानाच हिरेन यांचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. हिरेनच्या पत्नीने तिच्या पतीची हत्या करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला होता. त्यावरुन विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रचंड गदारोळ उडाला होता. विरोधकांनी सचिन वाझे यांना निलंबित करून त्यांच्या अटकेची जोरदार मागणी केली होती.

वाझे यांची आतापर्यंतची कारकीर्द.

मुंबई पोलीस दलातील सर्वच महत्त्वाच्या प्रकरणांचे तपास अधिकारी असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची आतापर्यंतची कारकीर्द वादग्रस्तच ठरली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली मोटार सापडल्याप्रकरणातही तपास अधिकारी असलेल्या वाझे यांच्या कथित संबंधांमुळे ते पुन्हा वादात सापडले आहेत.

१९९० च्या तुकडीतील वाझे यांनी आपली कारकीर्द गडचिरोलीतून सुरू केली. अल्पावधीतच ते ठाण्यातील चकमकफेम अधिकारी ठरले. त्यामुळेच मुंबई गुन्हे अन्वेषण विभागात त्यांचा मार्ग सुकर झाला. परंतु घाटकोपर बॉम्बस्फोटातील संशयित ख्वाजा युनुस याच्या हत्येप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले.

त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ते पुन्हा पोलीस दलात येण्याची शक्यता मावळली. मात्र जून २०२० मध्ये त्यांना पुन्हा सेवेत घेतले गेले. त्यांची थेट नियुक्ती विशेष गुन्हे अन्वेषण अधिकारी म्हणून केली गेली.

टीआरपी घोटाळा असो वा अमली पदार्थ तस्करी आदी महत्त्वाच्या प्रकरणांचे तेच तपास अधिकारी म्हणून नियुक्त झाले. रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्या अटकेसाठी आलेल्या रायगड पोलिसांच्या मदतीसाठीही वाझे यांनाच पाठविण्यात आले होते.

Leave a Comment