सदाभाऊंचा अमोल मिटकरींवर हल्लाबोल; म्हणाले की, तुकड्यावर जगणाऱ्या माणसांनी …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांना प्रत्युत्तर देत सदाभाऊंच्या बुडाला आग का लागली अशी विखारी टिका केली होती. त्यानंतर आता परत सदाभाऊ खोत यांनी मिटकरी यांच्यावर निशाणा साधला आहे. तुकड्यावर जगणाऱ्या माणसांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये असा पलटवार त्यांनी केला आहे.

सदाभाऊ म्हणाले, अमोल मिटकरींना माहिती नाही. मी आमदार, खासदार जन्माला घालणारा माणूस आहे. त्यामुळे तुकड्यावर जगणाऱ्या माणसांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये. सदाभाऊ सुपारी बहाद्दर नाही. तुम्ही सुपारी घेऊन ढोल-ताशा वाजवणाऱ्या बँडबाजावाले आहात. त्यामुळे तुमच्या वक्तव्याला महत्वं द्यावं असं काही नाही. वसंतदादांच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला याचा अभ्यास अमोल मिटकरींनी करावा. अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी मिटकरींवर पलटवार केलाय.

तत्पूर्वी पवारांवर टीका केल्यानंतर अमोल मिटकरी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला होता. शरद पवारांवर बोलताना आपण एवढ्या महान सुर्यासमोर बोलत आहोत. तिकडे थुंकण्याचा प्रयत्न केला तर थुंकी आपल्या तोंडावर उडते इतकं ज्ञान सदाभाऊंना असावं. सदाभाऊंना पुढील आमदारकी टिकवायची आहे. सदाभाऊ किंवा त्यांचा मित्र हे स्वत: बोलत नाहीत. यांचे मास्टरमाइंड देवेंद्र फडणवीस आहेत सदाभाऊची गत पाण्याविना मासोळी अशी झाली आहे. शरद पवारांनी काय केलं ते सोडा, पण सदाभाऊंच्या बुडाला आग का लागली हा विषय आहे असे मिटकरी म्हणाले.

सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले-

शरद पवार यांनी आपलं आडनाव बदलून आगलावे करावे. जाईल तिथे आग लावायची आणि दुसऱ्या घराला आग लावायला जायचं. त्यांचं आयुष्य हे आग लावण्यातच, आणि काड्या करण्यात गेलं त्यामुळे त्यांनी आपलं आडनाव पवारांऐवजी आगलावे असे करावं अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली