Monday, March 20, 2023

शिर्डी संस्थानने साई दर्शनासाठी भक्तांसाठी ठरविला ‘हा’ ड्रेस कोड

- Advertisement -

अहमदनगर । शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय पोषाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानानं भाविकांना केली आहे. अर्थात, याची सक्ती करण्यात आली नसून साईबाबा संस्थांनने भाविकांना अशी विनंतीवजा सूचना केली आहे. लॉकडाउननंतर मंदिर पुन्हा सुरू झाल्यानंतर घेण्यात आलेल्या या निर्णायाची दोन्ही बांजूनी चर्चा होत आहे. (Dress Code for Shirdi Saibaba Darshan)

देशातील काही मंदिरांमध्ये असे निर्णय पूर्वीच घेण्यात आले. त्यातील काही ठिकाणी ते वादग्रस्तही ठरले होते. आता शिर्डी संस्थानने भाविकांना अशी सूचना दिली आहे. मंदिर परिसरात संस्थानने असे सूचनाफलक लावले आहेत. त्यावर म्हटले आहे की, ‘साईभक्तांना विनंती आहे की, आपण पवित्र स्थळी प्रवेश करीत असल्याने कृपया भारतीय संस्कृतीनुसार वेशभूषा परिधान करावी.’ इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेत हे सूचना फलक लावण्यात आले आहेत.

- Advertisement -

संस्थानचा कारभार सध्या तदर्थ समितीमार्फत पाहिला जात आहे. संस्थानेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेऊन सूचना फलक लावण्यात आल्याचे सांगण्यात येते. इतर देवस्थानांप्रमाणेच शिर्डीतही कपड्यासंबंधी निर्णय घ्यावा, अशी मागणी यापूर्वीच काही भाविकांमधून होत होती. शिर्डीत दूरवरून भाविक येतात. अनेक जण पर्यटनाला यावे, तसे तोकड्या कपड्यांमध्ये येतात. त्याच कपड्यांमध्ये ते दर्शनालाही जातात. ही गोष्ट खटकत असल्याने काही भाविकांची ही मागणी होती.

सध्या तरी याची सक्ती करण्यात आलेली नाही. केवळ विनंतीवजा सूचना आहे. मात्र, याची अंमलबजावणी संस्थानच्या सुरक्षा व्यवस्थेकडून कशी केली जाते, हेही लवकरच कळेल. सक्ती झाली तर इतर ठिकाणी झाला तसा विरोध होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’