पगारवाढ : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यांच्या कामगारांना 12 टक्के

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | राज्य स्तरावर शासन नियुक्त त्रिपक्षीय समितीने शिफारस केल्यानूसार अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यातील कायम, हंगामी कायम व वेतनश्रेणी पगार घेत असलेल्या सर्व कामगार- कर्मचाऱ्यांना सध्याच्या वेतनावर 12 टक्के वेतनवाढ लागू करण्यात आली आहे. पगारवाढीमुळे कामगारांना प्रत्येकी सुमारे 4 हजार रुपये प्रमाणे पगार वाढ झाली असल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. पगारवाढीमुळे अधिकारी, कामगार- कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व आनंदी वातावरण आहे.

कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये पगारवाढीस सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. सदर सभेमध्ये कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांनी संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये त्रिपक्षीय कराराची संपूर्ण माहिती अवगत करून दिली. करारानुसार कामगारांना दि. 1 नोव्हेंबर 2021 पासून वेतनवाढ लागू करण्यात आली. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी चेअरमन सर्जेराव सावंत, व्हा. चेअरमन विश्वास शेडगे, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांच्यासह सर्व संचालक, अधिकारी, कामगार- कर्मचारी उपस्थित होते. वेतनवाढीबाबत कारखान्याच्या कामगार युनियनतर्फे आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह चेअरमन सावंत, व्हा. चेअरमन शेडगे, सर्व संचालक आणि कार्यकारी संचालक मोहिते यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले.

कारखाना व्यवस्थापन व कामगार-कर्मचारी यांचे संबंध नेहमीच सलोख्याचे, सौहार्दपूर्ण व एकमेकांस पुरक असे राहिले असून व्यवस्थापनामार्फत सुरूवातीपासूनच कामगार हिताची धोरणे राबवली जात असल्याने कर्मचारी वर्ग नेहमीच समाधानी राहिला आहे. तसेच कामगार-कर्मचारी सुध्दा प्रामाणिकपणे व निष्ठेने संस्थेची सेवा करून आपले योगदान देत आहेत. आज राज्यातीलच नव्हे तर देशातील सहकारी साखर कारखानदारी क्षेत्रात अजिंक्यतारा कारखान्याचा नावलौकिक आहे. कारखान्याच्या प्रगतीत कामगार, कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाट आहे, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे याप्रसंगी म्हणाले.

Leave a Comment