शिवरायांचा चित्रपटातून चुकीचा इतिहास दाखवल्यास गाठ माझ्याशी; संभाजीराजेंचा निर्मात्यांना गंभीर इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी अभिनेता सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेला ‘हर हर महादेव’ आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात वीर दौडले सात’ या चित्रपटांवर आज गंभीर आक्षेप घेतले. ऐतिहासिक चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड केली जात असून तसेच या चित्रपटांमध्ये इतिहासाचा विपर्यास करण्यात आला असल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला. चित्रपटातून चुकीचा इतिहास दाखवल्यास गाठ माझ्याशी आहे, असा इशाराही संभाजीराजे यांनी निर्मात्यांना दिला.

संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते काही चित्रपट निर्मात्यांवर आक्रमक झाले. हर हर महादेव आणि वेडात दौडले सात या दोन चित्रपटांवर त्यांनी आक्षेपही घेतला. चुकीचा इतिहास दाखवणाऱ्या चित्रपट निर्मात्यांनी संभाजीराजे आणि उदयनराजेंचा याला पाठिंबा आहे, सहकार्य आहे, असं खोटं दाखवलं आहे. हर हर महादेवसह या चित्रपटांवर तातडीने कायदेशीर कारवाई करणार आहे.

यावेळी त्यांनी चित्रपटांच्या दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना सूचक असा इशारा दिला. जर अशा चित्रपटांची निर्मिती केली तर गाठ माझ्याशी आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं आपण वाचत नाही, ही आपली देखील चुक आहे. त्यामुळे हे लोक इतिहासाची मोड तोड करुन आपल्या समोर मांडतात. सेन्सॉर बोर्डात ऐतिहासिक चित्रपटांसाठी समिती असावी, अशी मागणी यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी केली.