Tuesday, June 6, 2023

भाजपचे फायर ब्रँड प्रवक्ते संबित पात्रा यांच्यात आढळली कोरोनाची लक्षणं; रुग्णालयात दाखल

मुंबई । भाजपचे फायर ब्रँड प्रवक्ते संबित पात्रा यांच्यात कोरोनाची लक्षणं आढळल्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं. संबित यांच्याकडून मात्र याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, नुकतेचं भाजपमध्ये सामील झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी संबित पात्रा यांच्यासाठी एक ट्विटही केलं. यामध्ये, लवकरात लवकर बरे होण्याची कामना त्यांनी व्यक्त केली आहे. संबित पात्रा यांना गुडगावच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती मिळते आहे.

लवकरच संबित पात्रा यांची कोरोना टेस्ट होऊन त्याचा रिपोर्ट येण्याची शक्यता आहे. या निकालानंतर ते करोना पॉझिटिव्ह आहेत किंवा नाहीत, हे कळू शकेल.उल्लेखनीय म्हणजे, भाजप नेते संबित पात्रा हे स्वत: एक डॉक्टर आहेत. ते हिंदू राव हॉस्पीटलमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत होते. २०१९ साली लोकसभा निवडणुकीत ते ओडिशाच्या पुरी मतदारसंघातून निवडणूक लढले होते. परंतु, बीजू जनता दलाच्या पिनाकी मिश्रा यांनी त्यांना हरवलं होतं. दरम्यान, वृत्तवाहिन्यांवर आपल्या पक्षाची भूमिका मांडताना संबित पात्रा त्यांच्या आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जातात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”