पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांची मोठी कारवाई; 11 लाखांचे कोकेन घेऊन जाणाऱ्या तरुणाला पकडले

सांगली । पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली जिल्ह्यातील वाघवाडी फाटा येथे बेकायदा कोकेन अंमली पदार्थ बाळगून प्रवास करणाऱ्या टांझानिया देशातील तरुणास पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून सुमारे ११ लाख रुपये किंमतीचे १०९ ग्रॅम कोकेन हस्तगत केले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे. माकेटो जॉन झाकिया ( वय २५, रा. जमोरिया मंगानो, टांझानिया) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

झाकिया हा खाजगी ट्रॅव्हल्स बस (क्र. के. ए. ५१ ए. एफ ६२९१) मधून अंमली पदार्थ जवळ बाळगून प्रवास करीत असल्याची माहिती इस्लामपूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वाघवाडी फाटा (ता. वाळवा, जि. सांगली) येथे सापळा लावला. बसची झडती घेतली असता झाकिया हा आसन क्र. एल-१३ मध्ये बसला होता. त्याच्या बॅग मध्ये १०९ ग्रॅम कोकेन अमली पदार्थ मिळून आला. अंमली पदार्थ व एक मोबाईल पोलिसांनी हस्तगत करीत त्याच्या मुसक्या आवळल्या.

या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्याचे हवालदार दीपक ठोंबरे यांनी फिर्याद दिली. झाकिया विरुध्द अंमली पदार्थ द्रव्य व मनप्रभावी पदार्थ अधिनयमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा तरुण हा कोठून अमली पदार्थ घेऊन कोणत्या शहराकडे निघाला होता याचा तपास आता पोलीस करत आहेत.

You might also like