Thursday, October 6, 2022

Buy now

मंगळवेढा येथील खुनाचा सांगली पोलिसांकडून उलगडा, प्रेयसीच्या सांगण्यावरून तिच्या पतीचा तिघांनी केला होता खून

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

प्रेयसीच्या सांगण्यावरून तिच्या पतीचा प्रियकराने साथीदारांच्या मदतीने खून केल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील शिवणगी गावामध्ये घडली होती. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आत्महत्येचा बनाव केला होता. या प्रकरणी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तिघांना सापळा रचून अटक केली. प्रशांत अशोक पवार, शाहरुख रफिक शेख आणि अजय परशुराम घाडगे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक पेट्रोलिंग करत असताना पथकातील संतोष गळवे व संदीप पाटील यांना माहीती मिळाली कि, सांगली ते पंढरपुर रोडवरील तानंग फाटा येथे तिघेजण संशयित रित्या थांबलेले आहेत. पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने सापळा रचुन संशयीतांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली.

यावेळी त्यांनी सांगितले कि, रात्री एक वाजण्याच्या सुमारास शिवणगी येथे संशयित प्रशांत पवार याच्या प्रेयसीच्या सांगण्यावरून तिचा पती सत्यवान मच्छिद्र कांबळे याला घरी जावुन तो झोपलेला असताना दोरीने गळा आवळून खून केला. कोणास संशय येवू नये म्हणुन पुरावा नष्ट करण्याचे हेतुने घरातील पंख्याला दोरीने अडकवुन आत्महत्या केली असल्याचा बनाव केला असल्याची कबुली दिली. यानंतर पथकातील कर्मचाऱ्यांनी तिघांना ताब्यात घेत मंगळवेढा पोलिसांच्या स्वाधीन केले.