हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकऱ्यांच्या हत्या, शेतकऱ्यांचे रक्त यापेक्षा श्रीमंतांच्या पोरांची अमली पदार्थांची व्यसने आणि थेरं कुणाला महत्त्वाची वाटत असतील तर ‘जय जवान, जय किसान’चे नारे कशासाठी द्यायचे? बंद करा ती थेरं अशा शब्दांत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून संताप व्यक्त केला आहे. तिकडे उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारलं गेलं, यावर आवाज उठविण्याऐवजी मीडिया आर्यन खानच्या पाठीमागे धावला,अशी टीका संजय राऊतांनी केली.
लखीमपूर खेरीने देशाची मान शरमेने खाली गेली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा मुलगा आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी चढवून ठार करतो, त्याच वेळी हरयाणाचे मुख्यमंत्री खट्टर हे भाजप कार्यकर्त्यांना शेतकरी आंदोलकांना जशास तसे उत्तर द्या, असे सांगून हिंसेसाठी उत्तेजन देतात. एका राज्याचा मुख्यमंत्रीच शेतकऱ्यांविरुद्ध हिंसाचारास प्रोत्साहन देत असेल तर तेथील राज्यपालांनी ते शासन बरखास्त करण्याची शिफारस तत्काळ करायला हवी.
मीडियावर देखील साधला निशाणा
शेतकरी आंदोलन करीत असताना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने भरधाव गाडी शेतकऱ्यांच्या आंदोलनात घुसवून शेतकऱ्यांना ठार केले. त्यामुळे आंदोलक भडकले व हिंसाचार झाला. इतके मोठे मृत्युकांड होऊनही देशातला मीडिया शाहरुख खानच्या मुलाने 13 ग्रॅम ड्रग्ज घेतल्याच्या बातम्यांचा पाठलाग करीत आहे.
उत्तर प्रदेशात मंत्रीपुत्राने चार शेतकरी चिरडून मारले, यापेक्षा शाहरुख खानच्या पोराचे प्रताप या मंडळींना महत्त्वाचे वाटतात. शाहरुख खानचा मुलगा व त्याच्या नशेबाज मित्रमंडळींचे कृत्य हा श्रीमंतांचा माज आहे. त्यांच्यावर कायद्याने कठोरात कठोर कारवाई होईलच, पण शाहरुख पुत्राच्या कृत्याचे ढोल बडविताना मीडियाने उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्यांवर जणू पडदाच टाकण्याचा प्रयत्न केला.