शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात दिल्लीत बंद दाराआड चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या दिल्लीवारी वाढू लागल्या असल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे. अशात शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्यात दिल्लीत आज संसद भवनात बंद दाराआड तब्बल 20 मिनिटे चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांमधील चर्चा मात्र, अजूनही गुलदस्त्यात आहे.

नुकत्याच देशातील पाच राज्यातील निवडणूका पार पडल्या. या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपच्या महाराष्ट्रातील सर्व खासदारांशी संवाद साधला. एकीकडे मोदींनी बैठक घेतल्यानंतर दुसरीकडे खासदार संजय राऊत व खासदार शरद पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली.

सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत हे दिल्लीत आहेत. तर महत्वाच्या कामांसाठी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही दिल्लीत येत असतात. महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय घडामोडींवर संजय राऊत हे शरद पवारांची भेट घेणार असल्याची चर्चा केली जात होती. त्यानुसार आज दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा पार पडली.