टीम हॅलो महाराष्ट्र : छत्रपती शिवाजी महाराज ही कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही. महाराष्ट्रातील 11कोटी जनता शिवाजी महाराजांची वंशज आहे, असे परखड मत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
संजय राऊत म्हणाले, कोणी कोणत्या घराण्यात जन्माला आल्यामुळे महाराष्ट्रातील इतर श्रध्दास्थानाविषयी बोलण्याचा अधिकार त्यांना नाही. तंगड्या तोडण्याची भाषा लोकशाहीत चालत नाही. सामान्य माणूसही उदयनराजेंना उत्तर देईल. आम्हाला सातारा, कोल्हापूर गादीचा आदर आहे. उदयनराजे यांच्या आई कल्पनाराजे भोसले या लोकसभेला शिवसेनेच्या उमेदवार होत्या.
‘
आज के शिवाजी: नरेंद्र मोदी’ पुस्तकाबद्दल भाजपमध्ये असलेल्या शिवरायांच्या वंशजांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राऊत यांनी केली होती. त्यावर पक्षाचं नाव शिवसेना ठेवताना वंशजांना विचारलं होतं का, असं उदयनराजे यांनी म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना राऊत यांनी उदयनराजेंकडून वंशज असल्याचे पुरावे मागितले. लोकमत पत्रकारिता पुरस्कार वितरण समारंभात घेतलेल्या मुलाखतीत शिवाजी महाराजांच्या वंशजांनी वंशजाचे पुरावे द्यावेत अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.त्यांच्या या टिकेवरून उदयनराजे समर्थक आक्रमक झाले आहेत.
उदयनराजे भोसले समर्थकांनी राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून सातारा बंद पुकारला आहे. सकाळपासूनच साताऱ्यातील व्यवहार ठप्प झाले आहेत. साताऱ्यातील मुख्य बाजारपेठाही बंद झाल्या असून वाहतूक व्यवस्थाही तुरळक प्रमाणात सुरू आहेत. बसस्टँड परिसरातही दुकाने बंद असल्याने या परिसरात शुकशुकाट निर्माण झाला आहे.