व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

आम्हाला धोका असेल तर समोरच्यांनाही नाही का?; विधानपरिषद निवडणुकीवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे पुन्हा चुरस वाढली आहे. या निवडणुकीसाठी मतदानास सुरुवात झाली असून यावेळी महाविकास आघाडीपुढे सहाही जागा जिंकण्याचे आव्हान आहे. अशात आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे. “विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडीचे सर्व आमदार एकत्र आहेत. ही एकजूट सायंकाळी कळून येईल. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष हातात हात घालून चाललेले आहेत. आम्हाला धोका असेल तर समोरच्यांना नाही का? धोका एकतर्फी असतो का? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.

संजय राऊत यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडीचे सर्व आमदार एकत्र आहेत. काँग्रेसचे नाना पटोलेंनी जे सांगितले त्यामध्ये तथ्य आहे. आमदार पक्षासोबत असतानाही त्यांना सातत्याने धमक्यांचे निरोप येत होते. पण त्याचा काही परिणाम होणार नाही कारण लोकशाही आहे. लोकशाहीला काही मालक निर्माण झाले असले तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही या सर्वावर मात करु.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यसभेत राजकीय पक्षांची मते फुटली नव्हती. मात्र, विधान परिषदेत काहीही होऊ शकते. विधानसभेतील संख्या बळानुसार भाजपचे चार, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन तर काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. भाजपाचा पाचवा आणि काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराकडे विजयासाठी पुरेशी मते नाहीत. त्यामुळे अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या २९ आमदारांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.