कांजुरमार्ग जमीन वाद : संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाले की….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चपराक दिली आहे. कांजूर मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. कोर्टाचा हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. हा निर्णय दुर्दैवी असल्याचं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ही जमिन महाराष्ट्राची, सरकार महाराष्ट्राचं, मग हे मिठागरवाले आले कुठून? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

संजय राऊत म्हणाले, कांजूरच्या जागेवर कुणी राजकारणी बंगले किंवा फार्महाऊस बांधणार नाहीत. हा मुंबई, महाराष्ट्र आणि पर्यायानं देशाच्या विकासाचा विषय आहे. काल उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दुर्दैवी आहे. याच जमिनीवर मागील सरकार पोलिसांसाठी, गरीबांसाठी घरं बांधणार होतं. मग आता ही जमिन सरकारची नाही का? अशाप्रकारच्या प्रकल्पाला विलंब होईल अशी परिस्थिती निर्माण करायची, लोकांमध्ये रोष निर्माण करायचा आणि सरकारला बदमान करायचं, हे काम सध्या सुरु आहे,’ अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.

‘भाजपचं सरकार नसल्यानं असे निर्णय?’

न्यायालयानं लक्ष घालण्यासारखे देशात अनेक विषय आहेत. शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढतं आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. पंजाबमध्ये एका शिख संतांनी आत्महत्या केली आहे. पण महाराष्ट्रात भाजपचं सरकार नसल्यामुळे असे निर्णय येत आहेत का? असा प्रश्न लोकांना पडत असल्याचं राऊतांनी म्हटलंय.

आरेचं जंगल वाचवणं. आरेमधील अनेक जीव वाचवणं हे तर राष्ट्रीय कर्तव्य आहे. हा केंद्र सरकारचाच कार्यक्रम आहे. महाराष्ट्रात सरकार आलं नाही त्याचं दु:ख आम्ही समजू शकतो. पण अशाप्रकारे केंद्रीय यंत्रणा हाताशी धरुन महाराष्ट्राला, महाराष्ट्र सरकारला त्रास देणं फार काळ चालणार नाही, असा इशाराही संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment