उद्धव ठाकरेच 5 वर्ष मुख्यमंत्री, भाजपने त्रास करून घेऊ नये; राऊतांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील गृहखात्याच्या कारभारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असून गृहखाते शिवसेनेला हवं अशी बातमी समोर आली होती. त्यानंतर राष्ट्रवादी मुख्यमंत्रीपदासाठी उत्सुक आहे. तसंच शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदाच्या अदलाबदलीची शक्यता असल्याचा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर पलटवार केला आहे. उद्धव ठाकरेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहणार असून भाजपने त्रास करून घेऊ नये असा टोला त्यांनी लगावला.

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या एकूण सर्व प्रकरणावर भाष्य केले. मुनगंटीवार याना नाक खुपसण्याचं कारण काय आहे. हे तुम्ही कोण ठरवणार? असा सवाल त्यांनी केला. तसेच उद्धव ठाकरे हेच संपूर्ण 5 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील. भाजपने याबाबत स्वतःला त्रास करून घेऊ नये. मानसिक यातना झाल्या तर विविध प्रकारचे झटके येतात, प्रकृतीला ताण पडतो त्यामुळे तुम्ही अडीच वर्षे शांत बसा असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी भाजपला दिले.

ते पुढे म्हणाले, आतापर्यंतच्या परंपरेनुसार मुख्यमंत्र्यांकडे गृहखातं असतं. परंतु हे एकहाती सरकार नसल्याने ते शक्य नाही. हे तीन पक्षांचं सरकार आहे, त्यामुळे प्रत्येक पक्षाकडे वेगवेगळी जबाबदारी आहे,’ असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, तुम्हाला राज्याच्या राजकारणात आणून गृहमंत्रिपद दिलं तर ते स्वीकारणार का?’ असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला असता मी राज्याच्याच राजकारणात आहे. असे उत्तर राऊतांनी दिल्याने तर्क वितर्काना उधाण आले आहे.

Leave a Comment