सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांना खुद्द ईव्हीएमचा फटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

तिसऱ्या टप्प्यासाठी होत असलेल्या सांगली लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेस सुरवात झाली आहे. सकाळी सात वाजल्यापासून सांगली लोकसभा मतदार संघात मतदानासाठी सुरवात झाली आहे. सांगली लोकसभा मतदार संघासाठी एकूण १८ लाख ३ हजार मतदार आपला हक्क बजावणार आहेत. यासाठी एकूण १८०० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून यासाठी साडेचार हजार पोलीस आणि १२ हजार कर्मचारी वर्ग नेमण्यात आला आहे.

आज सकाळी ७ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरवात झाली आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर सांगलीत चुरस असल्याने सर्वच मतदान केंद्रावर पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात आला आहे. ग्रामीण भागामध्ये सकाळपासूनच मतदानकेंद्रांवर रांगा पाहायला मिळाल्या. सर्वच उमेदवार आणि नेत्यांनीही सकाळीच आपला मतदानाचा अधिकार बजावला. प्रारंभी सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांना खुद्द ईव्हीएमचा फटका बसला. ईव्हीएम यंत्रणेत बिघाड झाल्याने त्यांना काही काळ थांबावे लागले.

स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांनी त्यांच्या मूळ गावी पद्माळे येथे सकाळी सात वाजता जाऊन मतदानाचा हक्क बजावला. भाजप शिवसेना युतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी त्यांच्या मूळ गावी तासगाव चिंचणी येथे रांगेत उभारून मतदान केले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सहकुटुंब वाळवा तालुक्यातील साखराळे येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली.

सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी सह पत्नी मतदानाचा हक्क बजावला. सांगलीतील रिसाला रोडवरील उर्दू शाळेत असणाऱ्या मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड आल्याने तब्बल एक तास मतदान प्रक्रिया ठप्प होती. अखेर तिथले मशीन बदलल्यानंतर मतदानप्रक्रिया पूर्ववत झाली. तासगाव तालुक्यातील सावळज मध्येही मतदान यंत्रांचा घोळ संपता-संपत नव्हता. जिल्ह्यातील अपवाद वगळता सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु होती. मात्र ईव्हीएम मशिन्स बंद पाडण्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत.

Leave a Comment