सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
आषाढी एकादशीसाठी मुख्य पालख्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान होऊ लागले आहे. आषाढी एकादशीच्या काळात पंढरपुरात लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. मात्र, यंदा पंढरपुरात संचारबंदी लावण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे. तर, यंदाही पालख्या एसटीतून नेण्यात येणार आहेत. दरम्यान, आज संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सातारा जिल्ह्यातील लोणंद येथून पंढरपूरकडे रवाना झाले.
यावेळी लोणंद शहरामध्ये अहिल्याबाई पुतळ्याच्या चौकात भाविकांनी एकत्रित येत टाळ-मृदंगांचा वाद्य वाजवीत विठूनामाचा एकच गजर केला. यावेळी भाविकांनी हरिपाठही केला. दरम्यान, डॉ. नितीन सावंत यांनी पादुकांच्या स्वागतासाठी लोणंद शहरातील रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढून सजावट केली होती. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी लोणंद शहरातील भाविकांनी सकाळपासून गर्दी केली होती. फुलांनी सजवलेल्या बसमधून सकाळी साडेअकरा वाजता शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत लोणंद मधून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका बस मधून रवाना झाली.
https://www.facebook.com/1506067669510655/posts/4098043053646424/
यावेळी बसवर फुलांचा वर्षाव करून भाविकांनी पादुकांचे दर्शन घेतले. तसेच विठूनामाचा गजर करीत समाधान व्यक्त केले. यावेळी लोणंद शहरात पालखी येणार म्हण्टल्याने सातारा जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, फलटणचे डीवायएसपी तानाजी बर्डे, लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता. उद्या २० जुलै रोजी यंदाची आषाढी एकादशी आहे. पंढरपूर येथे यंदा आषाढी वारीसंदर्भात प्रशासनाने काही नियमावली जारी केली आहे. यंदाच्या आषाढी वारीत संचारबंदी करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत.