सातारा जिल्ह्याचा डंका : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सुवर्णसह 5 पदके

सातारा | सातारा जिल्हा क्रीडा संकुलात 64 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळविण्याच्या अपेक्षा असलेल्या पै. किरण भगतला पहिल्याच लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, अन्य गटांमध्ये सातारा जिल्ह्यातील मल्लांनी चांगली कामगिरी केली. सातारा जिल्ह्याने एक सुवर्ण, एक रौप्य व तीन कांस्य पदकांची कमाई केली, अशी 5 पदके सातारा जिल्ह्याने मिळवली आहेत.

साताऱ्यातील छत्रपती शाहु क्रीडा संकुलात 5 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत कोल्हापूरचा दबदबा राहिला. त्या पाठोपाठ पुणे जिल्ह्याने पदकांची लयलूट केली. तर सातारा जिल्ह्यातील मल्लांनीही आपली चुणूक दाखविली.

शनिवारी सकाळी झालेल्या सामन्यात 97 किलो माती गटात गणेश कुणकुणे याने पुण्याच्या रोहित जवळकर याच्यावर विजय मिळवत सुवर्ण पदकावर नाव कोरले. गणेशच्या रूपाने जिल्ह्याला एकमेव सुवर्णपदक मिळाले. तर 86 किलो माती विभागात रणजित राजमाने याने मुंबईच्या राम धायगुडेला एकेरी पटावर 4-0 अशी मात देत रौप्य पदक पटकावले. 97 किलो गादी गटात तुषार डोंगरे याने पुण्याच्या रोहित कारले याला 9-2 अशी धूळ चारत कांस्य पदक पटकावले. 61 किलो गादी गटात विशाल सूळ याला कांस्यपदक मिळाले. 74 किलो गादी गटात आकाश माने याने पुण्याच्या शुभम थोरात दुहेरी पटावर 3-1 अशी मात देत कांस्य पदकावर नाव कोरले.